Vidhan Sabha 2019 : उमेदवारी नाकारणाऱ्या कुडाळकरांची काँग्रेसमधून हकालपट्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

कुडाळ - कोणतीही पूर्वकल्पना न देता माघार घेतल्याने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

कुडाळ - कोणतीही पूर्वकल्पना न देता माघार घेतल्याने काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांची पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून हेमंत ऊर्फ काका कुडाळकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली होती. या उमेदवारीसाठी माजी आमदार पुष्पसेन सावंत यांचेही नाव होते; मात्र पक्षाने श्री. कुडाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांना उमेदवारी दिली होती; मात्र काका कुडाळकर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर काही तासानंतर आपण माघार घेत निवडणूक लढवित नसल्याचे ऑनलाईनवर पक्ष पदाधिकाऱ्यांना पाठवून या गोष्टीला पूर्णविराम दिला.

याबाबत आज जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी आमदार सावंत, माजी आमदार सुभाष चव्हाण, साईनाथ चव्हाण, तालुकाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा कार्याध्यक्ष विलास गावडे, विजय प्रभू, उमेदवार चेतन ऊर्फ रवींद्र मोडकर, मंदार शिरसाट आदी उपस्थित होते.

विकास सावंत म्हणाले, ""काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या तीन ठिकाणी आघाडी असून कुडाळ व कणकवलीसाठी काँग्रेस आघाडीचे उमेदवार रिंगणात आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सावंतवाडी येथून निवडणुकीला सामोरे जात आहेत. कुडाळ विधानसभा मतदार संघातून कुडाळकर व माजी आमदार सावंत यांची नावे पाठवण्यात आली होती. पक्षश्रेष्ठींनी कुडाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून त्यांना उमेदवारी दिली. कुडाळकर हे काल दुपारी दोन ते अडीच या वेळेत माझ्या सावंतवाडी कार्यालयात आले होते. त्यावेळी नाव घोषित करण्यात आले नव्हते. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काही तासाने त्यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आपण माघार घेतल्याचे ऑनलाईनवर मला तसेच माजी आमदार सुभाष चव्हाण, निरीक्षक राजन भोसले यांना पाठवले. महाराष्ट्रात अशा प्रकारे तीन ठिकाणी उमेदवार आम्हाला अचानक उमेदवार बदलावा लागला. पक्षाच्या विरोधात ही भूमिका घेतल्यामुळे पक्षप्रदेशांच्या आदेशानुसार त्यांची या पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली आहे.''

तिन्ही विधानसभा मतदारसंघात आघाडी म्हणून आम्ही धर्म पाळणार आहे. याठिकाणी तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे एकमताने काम करणार. या भागातील उमेदवार अरविंद मोंडकर यांना विजयी करण्यासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले.

समाजकारण करणारा राजकारण नाही
याबाबत माजी आमदार पुष्पसेन सावंत म्हणाले, ""आता यापुढे मी समाजकारण करणार राजकारण नाही. गेली वीस वर्षे कॉंग्रेस पक्षात कार्यरत असताना सुद्धा मला योग्य सन्मान मिळाला नाही. आज काका कुडाळकर आणि मी रिंगणात असताना माझी बरोबरी काका कुडाळकर यांच्याबरोबर केली ही मनाला चटका लावणारी बाब आहे. मला तिकीट नाकारल्यामुळे मी नाराज आहे. माझ्या पक्षाने योग्य विचार केला नसल्यामुळे पक्षात काम करायचे की नाही हे मी येत्या काही दिवसात ठरवणार आहे. खऱ्या अर्थाने मी राजकारण सोडून समाजकारणामध्ये उतरणार आहे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Kaka Kudalkar expelled from Congress