Vidhan Sabha 2019 : भाजप मेळाव्यात नारायण राणे म्हणाले....

Vidhan Sabha 2019 : भाजप मेळाव्यात नारायण राणे म्हणाले....

कणकवली - पुढील काही महिन्यात सिंधुदुर्गात सर्व सत्तास्थानांवर भाजपची सत्ता असेल. 2024 पर्यंत संपूर्ण कोकण शतप्रतिशत भाजपमय झालेले असेल, असा विश्‍वास माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. कणकवलीतून नीतेश राणे यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्‍य मिळायला हवे यासाठी कार्यकर्त्यांनी काम करा, असेही आवाहन त्यांनी केले. 

कणकवली मतदारसंघातील भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यानंतर भाजप कार्यालयासमोर भाजपचा मेळावा झाला. यात राणे यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्याला भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, ऍड. अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, विनय नातू आदी उपस्थित होते. 

राणे म्हणाले, ``1990 मध्ये मी सिंधुदुर्गात शिवसेना आणली आणि अल्पावधीत सिंधुदुर्ग शिवसेनामय झाला. 2005 मध्ये संपूर्ण जिल्हा कॉंग्रेसमय करून दाखवला. आता पुढील काही महिन्यातील सर्व सत्ताकेंद्र भाजपकडे निश्‍चितपणे असतील. आपला आणि भाजप नेत्यांचा जुना संबंध आहे. आमदार, मंत्री, मुख्यमंत्री ते विरोधी पक्ष नेता असताना भाजप नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.'' 

चव्हाण म्हणाले, ""2024 पर्यंत शतप्रतिशत भाजप यादृष्टीने पक्षसंघटनेची वाटचाल सुरू आहे. नारायण राणेंसारखे नेते भाजपत आल्याने आमची चिंता मिटली आहे. राणेंमुळे दोडामार्गपासून पालघर पर्यंत भाजपचीच सत्ता असेल.''

नीतेश राणे म्हणाले, ""गेली पाच वर्षे विरोधी बाकावर असतानाही कणकवली मतदारसंघात विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. आता सत्तेत असल्यामुळे कणकवली मतदारसंघ विकासाचे मॉडेल होईल.'' जयदेव कदम, डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तर आमदार प्रसाद लाड, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनीही मनोगत मांडले. 

तर भाजपचाही जयजयकार हवा! 
नीतेश राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कणकवली मतदारसंघातील शेकडो राणे समर्थकांनी रॅली काढली. या रॅलीत केवळ राणे कुटुंबातील सदस्यांचेच फोटो होते. "नीतेश राणे झिंदाबाद'च्या घोषणा दिल्या जात होत्या; मात्र खासदार नारायण राणे यांनी भाषणात "राणे झिंदाबाद' एवढीच घोषणा नको तर पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही जयजयकार व्हायला हवा, असे सांगितले. 

आठ दिवसांत भाजप प्रवेश 
येत्या आठ दिवसांत असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश करणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी दिली. तसेच आपण ज्या पक्षात असतो तेथे प्रामाणिकपणे काम करतो. भाजपच्या माध्यमातून जिल्हा समृद्ध करायचा आहे असेही ते म्हणाले. 

..तर ठाकरेंच्या सभेला उपस्थिती 
भाजप कार्यालयात खासदार राणे यांनीही पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी युतीबाबत बोलताना त्यांनी, शिवसेनेने युती धर्म पाळावा, असे आवाहन केले. जर कणकवलीत त्यांनी युती तोडली तर संपूर्ण राज्यात महायुतीला सुरूंग लागेल. कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघातही युती राहणार नाही, असे राणे म्हणाले. आम्ही युतीचा धर्म पाळणार आहोत. जर शिवसेनेकडून प्रचारासाठी बोलावणं आलं तर प्रसंगी उद्धव ठाकरेंच्या सभेलाही जावू, असेही राणे म्हणाले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com