Vidhan Sabha 2019 : सेनेच्या मेंढरांपेक्षा स्वाभिमानचे वाघ बरे 

Vidhan Sabha 2019 : सेनेच्या मेंढरांपेक्षा स्वाभिमानचे वाघ बरे 

दोडामार्ग - नवरा बायकोच्या मनोमिलनासाठी 36 गुण जुळावे लागतात; पण स्वाभिमान आणि भाजपची आक्रमकता हा एकच गुण जुळल्याने आमचे मनोमिलन झाले आहे. शिवसेनेच्या मेंढरांबरोबर काम करण्यापेक्षा स्वाभिमानच्या सिंह आणि वाघांबरोबर काम करणे अधिक चांगले, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केले. 

येथील महाराजा हॉलमध्ये स्वाभिमान आणि भाजपचा मनोमिलन मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर गोव्याचे आमदार दयानंद सोपटे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, "स्वाभिमान'चे पक्षनिरीक्षक प्रमोद कामत, एकनाथ नाडकर्णी, विजयकुमार मराठे, जिल्हा परिषद सदस्य अनिशा दळवी, उपसभापती बाळा नाईक, उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, रमेश दळवी, संतोष नानचे, राजेंद्र निंबाळकर, विलास सावंत, दीपिका मयेकर, संदीप नाईक, चंदू मळीक, विशांत तळवडेकर, संजय सातार्डेकर, रंगनाथ गवस आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, ""युती धर्म आम्ही मोडला नाही, तो शिवसेनेने मोडला. मंत्री असलेल्या विनोद तावडे यांना भाजपने तिकीट नाकारले म्हणून त्यांनी पक्ष सोडला नाही; पण भाजपचे असलेले संदेश पारकर आणि अतुल रावराणे भाजपचे उमेदवार नितेश राणे यांना विरोध करतात. त्यांच्याकडे ना क्वालिटी आहे ना क्वांटिटी, त्यामुळे त्यांच्या विरोधाने काहीही होणार नाही.'' 

भाजप पुरस्कृत राजन तेली यांना निवडून देण्यासाठी जीवाचे रान करा. आता स्वाभिमान आणि भाजपचे कार्यकर्ते एकत्र आल्याने विजय आणि विकास शक्‍य आहे. मनोमिलन झाले, आता माघार नाही असेही ते म्हणाले. आमदार वैभव नाईक पळपुटे आहेत. मागच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरतेवेळी नारायण राणे यांना सामोरे जाताना ते वाट बदलून पळाले; पण त्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. त्याचे फळ यावेळी मिळणार. तिनही आमदार भाजपचेच निवडून येणार. स्वाभिमान आणि आम्ही एक झाल्याने पालघरपासून दोडामार्गपर्यंतचा भाग भाजपमय होणार, असे सांगून ते म्हणाले, ""आम्ही नीती सोडणार नाही, शिवसेनेने कणकवलीच्या एका जागेत चोंबडेपणा केला. त्यांनी आमच्या उमेदवाराविरुद्ध एबी फॉर्म देऊन उमेदवार उभा केला. या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोचवून राजन तेली यांच्या "कपाट' चिन्हाला मत देऊन शिवसेनेला भुईसपाट करा.'' 

पालकमंत्री केसरकर यांनी प्रचार फलकावर माझा फोटो लावण्याच्या परवानगीसाठी फोन केला तेव्हा आपण त्यांना जो प्रकार शिवसेनेने कणकवलीत केला ती मोठी चूक आहे. त्याच्याशी मी सहमत नाही, असे स्टेटमेंट द्या, असे सांगितले; पण दोन दिवस होवूनही त्यांचा फोन नाही. याचा अर्थ येथे युती नाही. त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते आणि मतदारांनी श्री. तेली यांना साथ द्या असे आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी पालकमंत्री केसरकर यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसेच तेली यांना का निवडून द्यावे याबाबत मार्गदर्शन केले. 

दोडामार्ग भारतातील अमेझॉन 
आपल्याला प्रदेशातील एका व्यक्तीने आपल्या सिंधुदुर्गातील दोडामार्ग हे भारतातील अमेझॉन असल्याचे सांगून खूप छान वर्णनही केले; पण पालकमंत्री केसरकर यांनी त्याची वाट लावली असा आरोप केला. 

सर्व मिळून विकास करूया 
गोव्याचे आमदार तथा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे मेळाव्याला उपस्थित होते. त्यांनी सिंधुदुर्गचा गोव्याप्रमाणे पर्यटन विकास शक्‍य आहे. त्यामुळे आपण दोघांनी मिळून सिंधुदुर्गचा विकास करूया असे सांगितले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com