Vidhan Sabha 2019 : रामदास कदम म्हणाले, बाडग्याला गाडल्याशिवाय स्वस्थता नाही 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

खेड - ज्यांनी पदे उपभोगली, सत्ता प्राप्त केली, ज्यांची ओळखदेखील सेनेमुळे झाली, त्यांनी खेडच्या तीनबत्ती नाक्‍यात भगवा पायदळी तुडवला आहे. ही गोष्ट समजली त्याचवेळी मी ठरवले या बाडग्याला गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. गतवेळच्या निवडणुकीत ज्यांनी भगवा खाली उतरवला त्यांना घरी बसवण्याची वेळ आलेली आहे, असे प्रतिपादन रामदास कदम यांनी केले. 

दापोलीत मेळाव्यात ते म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात युती आहे. दापोली मतदारसंघात महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवू या, विकासासाठी सर्वजण एकत्र येऊ. मी 6 वेळा आमदार, विरोधी पक्षनेता, मंत्री होऊ शकलो. कांदिवलीच्या झोपडपट्टीत राहणारा मुलगा आज जी पदे उपभोगतो आहे, ते फक्त बाळासाहेब आणि शिवसेनेमुळे. त्यांच्यामुळे हे नाव, प्रतिष्ठा मला मिळाली आहे. 

गेल्या तीन वर्षांत सेनेच्या माध्यमातून दापोली मतदारसंघात विकासाच्या माध्यमातून योगेश काम करीत आहेत. पुन्हा दापोलीत भगवे वादळ घोंगावत असून, या निवडणुकीत पुन्हा दापोली मतदारसंघावर भगवा डौलाने फडकेल. आपण संपूर्ण देशात आणि राज्यात एकत्र काम करीत आहोत. 2009 साली युती असतानादेखील भाजपचे माजी आमदार नातू यांनी माझ्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली. त्यावेळी माझा पराभव झाला. ही गोष्ट आजही शिवसैनिक विसरलेले नाहीत. महाराष्ट्राच्या विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ही निवडणूक लढवूया. 

भाजपच्या प्रश्‍नाला थेट उत्तर 
नगरपंचायतीमध्ये सेनेने कॉंग्रेससोबत आघाडी केली. त्यामुळे आम्ही या निवडणुकीत युती का करावी, असा पवित्रा भाजपच्या कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत घेतला आहे. त्यावर बोलताना कदम म्हणाले, त्यावेळी भाजपचे पदाधिकारीसुद्धा कॉंग्रेसचे भाई जगताप यांच्याशी संपर्कात होते. परंतु, जगताप हे माझे जुने मित्र आहेत. त्यांनी माझ्या विचारांशी एकरूप होत आघाडी केली होती. त्यामुळे मी युती तोडली असे म्हणू नका. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Ramdas Kadam comment