Vidhan Sabha 2019 : रिफायनरी समर्थकांचा पाठिंबा कोणाला? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

राजापूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समर्थन आणि विरोधाने तालुक्‍यातील नाणार रिफायनरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. प्रचाराच्या मुद्यांच्या अनुषंगाने रिफायनरीचा मुद्दाही चांगलाच गाजणार आहे. भाजपने रिफायनरीचे समर्थन केले असले तरी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांनी रिफायनरीला कडाडून विरोध केला. 

राजापूर - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर समर्थन आणि विरोधाने तालुक्‍यातील नाणार रिफायनरीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. प्रचाराच्या मुद्यांच्या अनुषंगाने रिफायनरीचा मुद्दाही चांगलाच गाजणार आहे. भाजपने रिफायनरीचे समर्थन केले असले तरी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांनी रिफायनरीला कडाडून विरोध केला. 

गेल्या दोन वर्षांपासून तालुक्‍यामध्ये रिफायनरीचा मुद्दा गाजत आहे. त्याचा राजकीय फायदा लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला झाला. शासनाने रिफायनरीची भूसंपादन अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केली होती. त्यामुळे निवडणुकीत नाणार प्रकल्पाच्या रद्द झालेल्या अधिसूचनेवरुन राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली होती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे जोरदार प्रकल्प समर्थन आणि त्यानंतर शिवसेनेचा प्रकल्पाला जोरदार विरोध अशी परस्पर विरोधी भूमिका पाहायला मिळाली. रिफायनरीच्या मुद्द्याने गाजणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

रिफायनरीचे जोरदार समर्थन करणाऱ्या कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांनी लोकसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांना फारसे यश आले नसले तरी, त्यांनी विरोधकांसोबत समर्थकही कार्यरत आहेत. त्यांची "अरे ला कारे' म्हणण्याची ताकद असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे यावेळी कोकण जनकल्याण विधानसभेची निवडणूक लढविणार का ? किंवा त्यांनी निवडणूक लढविली नाही, तर त्यांची नेमकी कोणती भूमिका राहणार, समर्थकांचा कोणाला पाठिंबा राहणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रकल्पविरोधी भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारांना प्रकल्प समर्थकांचा पाठिंबा नसेल, तर प्रकल्प समर्थक "नोटा'चा अधिकार बजावणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

ऊर्जा शिवसेनेच्या उमेदवाराला 
2009 आणि 2014 या दोनवेळच्या निवडणुका जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाभोवती फिरल्या होत्या. त्यावेळी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधाची ऊर्जा शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली होती. सद्यस्थितीमध्ये जैतापूर प्रकल्पाचा मुद्दा मागे पडला असून रिफायनरीचा मुद्दा चर्चेत आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रिफायनरीचा मुद्दा तापला आहे. त्यामुळे यावेळी निवडणुकीचा प्रचार अन्य मुद्द्यांच्या अनुषंगाने रिफायनरीच्या मुद्द्याच्या भोवतीही फिरणार आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Refinery issue in Election campaigning