Vidhan Sabha 2019 :  सावंतवाडीत राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाच्या गळ्यात ? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

सावंतवाडी - आघाडीच्या जागा वाटपात येथील विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे. या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे व पक्षाच्या निरीक्षक अर्चना घारे - परब यांची नावे चर्चेत आहेत.

सावंतवाडी - आघाडीच्या जागा वाटपात येथील विधानसभेची जागा राष्ट्रवादीला सुटणार आहे. या पक्षाची उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे व पक्षाच्या निरीक्षक अर्चना घारे - परब यांची नावे चर्चेत आहेत. 

सावंतवाडी मतदार संघात राष्ट्रवादीची संघटना मजबूत होती. याच पक्षाच्या तिकीटावर दीपक केसरकर पहिल्यांदा आमदार झाले. त्यांच्या पक्ष त्यागानंतर तेथे संघटना कमजोर झाली. आता मात्र युती झाली तर केसरकरांची मुख्य लढत राष्ट्रवादीशी असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत उत्सुकता आहे. सहकार क्षेत्रात भरीव काम केलेले एम. के. गावडे हेही उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून त्यांना उमेदवारीबाबत शब्द मिळाल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. या मतदार संघात राष्ट्रवादीचे निरीक्षक म्हणून आलेल्या घारे - परब यांचे नावही चर्चेत आहे. त्यांनी स्वतःतसे जाहीर केले नसले तरी मतदार संघात संपर्क वाढवण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांची मालिकाच सुरू केली आहे. एकूणच राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्कंठा वाढली आहे. 

सध्यातरी ते राष्ट्रवादीत नाहीत... 

या उमेदवारीसाठी सावंतवाडीचे नगराध्यक्ष साळगावकर हे इच्छूक आहेत. त्यांना मानणारा एक वर्ग आहे. शिवाय त्यांनी केसरकरांविरोधात आतापासूनच आघाडी उघडली आहे. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी त्यांच्या पाठिशी राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. असे असले तरी ते शिवसेनेच्या तिकीटावर नगराध्यक्ष झाले आहेत. यामुळे तांत्रिकदृष्ट्या सध्यातरी ते राष्ट्रवादीत नाहीत.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Sawantwadi Constituency NCP Candidate special story