Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गात सरासरी 63.55 टक्के मतदान

Voting in Degave sindudurg
Voting in Degave sindudurg

कणकवली - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तीन जागांसाठी आज सरासरी 63.55 टक्के मतदान आज झाले. यात पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक आणि आमदार नीतेश राणे या दिग्गजासह त्यांच्या स्पर्धकांचे भविष्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे. 

जिल्ह्याच्या तीन मतदारसंघात 3 लाख 33 हजार 740 पुरूष मतदार आणि 3 लाख 36 हजार 843 स्त्री मतदार असे एकूण 6 लाख 70 हजार 583 मतदारांमधून अंदाजे 63.55 टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.       

कणकवली मतदारसंघात 1 लाख 12 हजार 867 पुरूष मतदार आणि 1 लाख 17 हजार 157 स्त्री मतदार आहेत. या मतदारसंघात अंदाजे 62.59 टक्के, कुडाळ मतदारसंघात 1 लाख 7 हजार 266 पुरूष मतदार आणि 1 लाख 8 हजार 574 स्त्री मतदार आहे. या मतदारसंघात 63.58 टक्के अंदाजे मतदान झाले तर सावंतवाडी मतदारसंघात 1 लाख 13 हजार 607 पुरूष मतदार आणि 1 लाख 11 हजार 112 स्त्री मतदार आहे. या मतदारसंघात अंदाजे 64.58 टक्के मतदान झाल्याचे डॉ.पांढरपट्टे यांनी  सांगितले

कणकवलीच्या निकालाकडे साऱ्यांच्याच नजरा

राज्यात कणकवली मतदारसंघात युती नसल्याने शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले.  यात राणे विरुद्ध शिवसेना असा मुकाबला रंगल्याने कणकवलीची लढत राज्यात लक्षवेधी ठरली आहे. कुडाळ आणि सावंतवाडी मतदारसंघातही शिवसेना उमेदवारांविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवारांसाठी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यासह भाजपच्या जिल्ह्यातील मंडळींनी जोरदार प्रचार राबवला. त्यामुळे कणकवलीसह कुडाळ आणि सावंतवाडीत काय निकाल लागतो याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

दिवसभर पावसाची उघडीप

सिंधुदुर्गात आज दिवसभर पावसाची उघडीप होती; मात्र सकाळच्या सत्रात शेतकर्‍यांनी भात कापणीसाठी शेताकडे धाव घेतली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात संथगतीने मतदान झाले. दुपारी उन्हाचा तडाखा असल्याने मतदान केंद्रांवर गर्दी कमी होती. तर दुपारी तीन वाजल्यानंतर सर्वच केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक मतदान केंद्रावरील इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिनमध्ये वारंवार बिघाड झाल्याने मतदार रांगामध्ये ताटकळत राहिले होते. दरम्यान जिल्ह्यातील सखी मतदान केंद्रांवर तयार करण्यात आलेला सेल्फी पॉइंट महिला मतदारांसाठी विशेष आकर्षण ठरला होता.

सिंधुदुर्गात प्रामुख्याने कणकवलीत तगडा मुकाबला असल्याने सर्वच मतदान केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. याखेरीज शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेतेमंडळींवरही पोलिसांनी करडी नजर ठेवली होती. तर शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनाही चोवीस तास पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. आज कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस यंत्रणेने सर्वच मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवले होते. तर मतदान केंद्रावरही पाच पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना येण्यास मज्जाव केला जात होता. 

सायंकाळी 5.45 पर्यंत झालेले मतदान
कणकवली 61.35 टक्के
कुडाळ 58.43 टक्के
सावंतवाडी 59.37 टक्के

जिल्ह्यातील प्रमुख लढती
कणकवली - नीतेश राणे (भाजप), सतीश सावंत (शिवसेना)
सावंतवाडी - दीपक केसरकर (शिवसेना), राजन तेली (अपक्ष भाजप पुरस्कृत) आणि बबन साळगावकर (राष्ट्रवादी)
कुडाळ - वैभव नाईक (शिवसेना), रणजित देसाई (अपक्ष, भाजप पुरस्कृत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com