Vidhan Sabha 2019 : दिग्गज प्रचारकांची रत्नागिरी जिल्ह्याकडे पाठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

राज्यात विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक व दिग्गज नेत्यांच्या सभांनी नुसता धुरळा उडवून दिला आहे. रत्नागिरी जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक असताना एकाही मोठ्या नेत्याच्या सभेचे नियोजन कोणत्याच पक्षाने केलेले दिसत नाही.

रत्नागिरी - राज्यात विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक व दिग्गज नेत्यांच्या सभांनी नुसता धुरळा उडवून दिला आहे. रत्नागिरी जिल्हा मात्र त्याला अपवाद ठरला आहे. निवडणुकीला अवघे पाच दिवस शिल्लक असताना एकाही मोठ्या नेत्याच्या सभेचे नियोजन कोणत्याच पक्षाने केलेले दिसत नाही. उद्धव ठाकरे यांची सभादेखील रद्द झाली आहे. शिवसेनेची जिल्ह्यात मोठी ताकद असल्याने नेत्यांनी जिल्ह्याकडे पाठ केली असून स्थानिक पातळीवरील प्रचारावर भर दिल्याचे चित्र आहे.  

लोकसभा निवडणुकीत जी हवा होती, त्याच्या निम्म्यानेही विधानसभेचे वातावरण दिसत नाही. अतिशय शांत आणि त्या-त्या पातळीवर जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात प्रचार सुरू आहे. आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी किंवा प्रमोशनसाठी त्या-त्या पक्षाचे स्टार प्रचारक किंवा दिग्गज नेते येतात. मात्र, जिल्ह्यात कोणत्याच पक्षातील दिग्गज नेत्यांची सभा असल्याचे नियोजन दिसत नाही.

राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार सुनील तटकरे हे दापोली मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार संजय कदम तर गुहागरचे उमेदवार सहदेव बेटकर यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यांच्या सभा झाल्या. तर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव यागेश कदम हे दापोली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून लढत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी रामदास कदम यांच्या सभा होत आहेत. या पलीकडे अन्य नेता किंवा मोठ्या सभा झालेल्या नाहीत.  

गुहागर सेनेचे भास्कर जाधव विरुद्ध राष्ट्रवादीचे सहदेव बेटकर 
अशी लढत आहे. चिपळूण शिवसेनेचे सदानंद चव्हाण विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम, राजापूर सेनेचे राजन साळवी विरुद्ध काँग्रेसचे अविनाश लाड आणि रत्नागिरी शिवसेनेचे 
उदय सामंत विरुद्ध राष्ट्रवादीचे सुदेश मयेकर अशी पाचही मतदारसंघातील लढती आहेत. 

सभा फक्त कणकवलीत
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची एक जाहीर सभा होणार असल्याची चर्चा होती. मात्र, त्यांची सभा फक्त कणकवलीत होणार आहे. रत्नागिरीतील सभेचे नियोजन रद्द झाल्याचे सांगण्यात आले. पुढील काळामध्ये अन्य कोणत्या मोठ्या नेत्याची सभा असल्याची चर्चा किंवा नियोजन नसल्याने शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात दिग्गजांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. 

उमेदवार हिरमुसले...
येत्या २१ तारखेला मतदान आहे. पाच दिवस शिल्लक असताना दिग्गजांनी जिल्ह्याकडे पाठ केल्याने अनेक राजकीय उमेदवार हिरमुसले आहेत. मात्र, त्यांनी स्थानिक पातळीवर वैयक्तिक भेटीगाठी, सभांवर जोर देत प्रचार सुरू ठेवला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Star campaigners avoid Ratnagiri District