Vidhan Sabha 2019 : उद्धव ठाकरे म्हणाले, योग्यवेळी युतीतील मिठाचा खडा बाजूला करणार

Vidhan Sabha 2019 : उद्धव ठाकरे म्हणाले, योग्यवेळी युतीतील मिठाचा खडा बाजूला करणार

कणकवली - संपूर्ण कोकणात कणकवलीची एकमेव जागा भाजपला सुटली होती. येथे भाजपने त्यांचा एखादा कट्टर कार्यकर्ता दिला असता तर त्याच्या प्रचारालाही मी आलो असतो; मात्र आता आम्हाला येथे भगवा फडकवायचा आहे. शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना विजयी करायचं आहे; मात्र तुम्ही जर दादागिरी कराल तर आम्ही ती तोडून मोडून काढू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे प्रचार सभेत दिला.

कणकवलीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेच्या विजयोत्सवात सामील होण्यासाठी आम्ही देखील येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. शिवसेनेचे उमेदवार सावंत यांच्या प्रचाराची सभा येथील गडनदी पात्रालगतच्या मैदानात झाली. यात उद्धव ठाकरे यांनी राणेंचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपनेही त्यांच्यापासून सावध राहावं, असा सल्ला दिला. संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरेंनी भाजपशी तसेच मुख्यमंत्र्यांशी आपले चांगले संबंध असल्याचे दाखले वारंवार दिले; मात्र भाजपमध्ये ‘ते’ गेल्यामुळे युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. तो या निवडणुकीत आम्ही बाजूला करणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

येथे शिवसेनेचे सावंत आणि भाजपचे नीतेश राणे यांच्यात थेट लढत होत आहे. राणे यांच्या प्रचारासाठी काल (ता. १५) मुख्यमंत्र्यांची सभा झाली. त्यामुळे सभेत श्री. ठाकरे काय बोलतात, याची उत्सुकता होती. शिवसेनेच्या सभेला उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते संजय राऊत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना उमेदवार सतीश सावंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘आमचा लढा भाजपशी नाही. मुख्यमंत्र्यांशीही नाही. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध आहेत. आमचा लढा आहे तो इथल्या प्रवृत्तीशी. भाजपने त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याला तिकीट दिले असते तरीही आम्ही त्याच्या प्रचाराला आलो असतो; पण ज्यांनी बाळासाहेबांना त्रास दिला, त्यांच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहणार आहे.’’

ते म्हणाले, ‘‘आम्ही भाजपवर टीका करणार नाही. आम्ही मैत्रीला जागणारे आहोत; मात्र मित्रावर संकट येणार असेल तर त्याला सावध करणं हे देखील आम्ही आमचं कर्तव्य समजतो. त्यांना घेऊन भाजपने मोठा धोका पत्करला आहे. त्यांनी शिवसेना सोडली, काँग्रेस सोडली, स्वतःचा स्वाभिमान पक्ष देखील विसर्जित केला. त्यामुळे आता भाजप पक्षाने वेळेत सावध व्हायला हवं.’’

ते म्हणाले, ‘‘राणेंसोबत शिवसेना सोडण्याची चूक सतीश सावंत यांनी केली नसती तर ते आज वैभव नाईक यांच्याप्रमाणे शिवसेनेचे आमदार झाले असते; मात्र तशी चूक आता पुन्हा कुणी करू नये. मी सावंत यांच्या प्रचारासाठी नव्हे तर विजयासाठी आलेलो आहे. येत्या २४ तारखेला विधानसभेचा निकाल लागेल तेव्हा आमचे सगळे लक्ष कणकवलीकडे असेल. एवढं नव्हे तर सावंत यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही स्वतः कणकवलीत निकालाच्या दिवशी येणार आहोत.’’

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘ते आता शिवसेनेची माफी मागत आहेत; पण ते कुणाकुणाची माफी मागणार? रमेश गोवेकर, श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांचं काय झालं? त्या सर्वांची माफी मागणार का?’’

उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले, ‘‘शिवसेनेला राणेंशी तडजोड मान्य नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांत अनेक संकटांचा यशस्वी मुकाबला केला. खडसेंनाही जुमानलं नाही; मात्र आता ते विघ्न घरात घेताहेत; मात्र ते एक दिवस मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला बॉम्ब लावल्याशिवाय राहणार नाहीत. तसा प्रकार झाला तर संपूर्ण शिवसेना मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे.’’

संजय राऊत यांनी कणकवलीत मैत्रीपूर्ण लढत नाही तर न्यायाची लढाई असल्याचे सांगितले. इथे सांडलेल्या शिवसैनिकांच्या रक्‍ताचा सूड इथले मतदार आणि शिवसैनिक घेतील, असेही ते म्हणाले. तसेच येत्या २४ तारखेला आम्ही कणकवलीत दीपोत्सव साजरा करणार असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली. संदेश पारकर, अतुल रावराणे, वैभव नाईक, सतीश सावंत यांचीही भाषणे झाली.

नाणार प्रकल्पाला विरोधाची भूमिका
आम्हाला कोकण हिरवंगार हवं आहे. इथल्या निसर्गाचा विनाश करून आम्हाला विकास नको आहे. जे कोकण आहे ते बरं आहे. नाणार, रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणची राखरांगोळी होईल. इथलं वैभव टिकवण्यासाठी शिवसेना काळजी घेईल, अशी भूमिका श्री. ठाकरे यांनी या सभेत जाहीर केली.

आता भाजपला शुभेच्छा देतोय
राणेंनी शिवसेना पक्ष सोडला तेव्हा काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना आम्ही शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी सर्वच अवाक्‌ झाले होते; मात्र राणेंनी काँग्रेस पक्ष सोडला त्यावेळी सर्वांना आम्ही शुभेच्छा का दिल्या, याची उकल झाली. आता राणेंनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आम्ही भाजप पक्ष आणि मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देतोय, असे श्री. ठाकरे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com