Vidhan Sabha 2019 : सिंधुदुर्गात शहरी विरूद्ध ग्रामीण नेतृत्वात स्पर्धा

विनोद दळवी
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

ओरोस -  राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी होवू घातलेल्या 21 ऑक्‍टोबर रोजीच्या मतदानाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात राजकीय धुरळा उडू लागला आहे. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यात विजयी कोण होईल, हे 24 ला स्पष्ट होणार आहे; मात्र या निवडणुकीत शहरी विरुद्ध ग्रामीण नेतृत्व यांच्यातच खरी लढत होणार आहे.

ओरोस -  राज्याच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी होवू घातलेल्या 21 ऑक्‍टोबर रोजीच्या मतदानाच्या निमित्ताने सिंधुदुर्गात राजकीय धुरळा उडू लागला आहे. आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यात विजयी कोण होईल, हे 24 ला स्पष्ट होणार आहे; मात्र या निवडणुकीत शहरी विरुद्ध ग्रामीण नेतृत्व यांच्यातच खरी लढत होणार आहे.

जिल्ह्यातील प्रभावी उमेदवारांत तीन ग्रामीण, तीन शहरी नेतृत्व आहे. त्यांनी आपल्या राजकीय पर्वाला ग्रामीण अथवा शहरी भागात सुरुवात केली आहे. तर एक प्रभावी उमेदवार शहरी अथवा ग्रामीण भागात राजकीय सुरुवात न करता थेट आमदार झालेले आहेत. त्यामुळे ते सर्वसमावेशक आहेत. जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ व कणकवली असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर 23 उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

सावंतवाडीमध्ये नऊ, कुडाळमध्ये सात व कणकवलीमध्ये सात असे रिंगणात राहिलेल्या उमेदवारांचे समीकरण आहे. तिन्ही मतदार संघात मोठ्या संख्येने उमेदवार रिंगणात असेल तरी सावंतवाडीमध्ये तिरंगी तर कुडाळ व कणकवली मतदार संघात दुरंगी चुरशीची लढत होणार आहे.

सावंतवाडी मतदार संघात तिरंगी लढत होणार असल्याने विद्यमान पालकमंत्री दीपक केसरकर, भाजपचे प्रदेश सरचिटणीस व युतीचे बंडखोर उमेदवार राजन तेली व आघाडीचे प्रेमानंद ऊर्फ बबन साळगांवकर यांच्यात ही प्रमुख लढत होणार आहे. यातील केसरकर यांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा सावंतवाडी शहरात नगरसेवक पदापासून केला आहे. नगरसेवक, नगराध्यक्ष ते आमदार व गेली पाच वर्षे मंत्री असा त्यांचा प्रवास आहे.

अपक्ष उमेदवार राजन तेली यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणजे ग्रामीण नेतृत्वापासून प्रारंभ केला आहे. जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्ष ते विधान परिषद आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आघाडीचे उमेदवार बबन साळगांवकर यांनीही आपला राजकीय प्रवास सावंतवाडीत नगरसेवक पदापासून केला आहे. त्यानंतर ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाले. म्हणजेच या मतदार संघातील या तीन प्रभावी उमेदवारांत केसरकर व साळगांवकर हे शहरी नेतृत्व तर तेली हे ग्रामीण नेतृत्व आहे.

कुडाळ मतदार संघात सात उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेनेचे वैभव नाईक व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्यातच खरी रंगतदार लढत होणार आहे. या दोन प्रभावी उमेदवारांत नाईक यांनी कणकवली नगरपालिकेत नगरसेवक या पदापासून सुरु केली आहे. ते कणकवलीचे उपनगराध्यक्ष सुद्धा होते. त्यानंतर त्यांनी गेली पाच वर्षे या मतदार संघात आमदार म्हणून काम केले आहे. याचाच अर्थ नाईक हे शहरी भागात तयार झालेले नेतृत्व आहे. तर देसाई हे यांनी कुडाळ तालुक्‍यात जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणात सुरुवात केली आहे.

जिल्हा परिषदेच्या मागच्या टर्ममध्ये ते सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ही जबाबदारी यशस्वी निभावली आहे. जिल्हा परिषदेच्या विद्यमान टर्ममध्ये ते नेरूर मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यानंतर ते गेली दोन वर्षे पुन्हा जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या दोन उमेदवारांच्या राजकीय प्रवासाच्या प्रारंभाचा विचार केल्यास नाईक हे शहरी नेतृत्व आहे. तर देसाई हे ग्रामीण नेतृत्व आहे.

कणकवली मतदार संघात सुद्धा सात उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत; मात्र यातील तुल्यबळ लढत दोनच उमेदवारांत होत आहे. भाजपचे उमेदवार नितेश राणे व शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांच्यात ही लढत होत आहे. यातील राणे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात थेट आमदार म्हणून केली आहे. तर सावंत यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरुवात केल्यानंतर ते सलग पाचवेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. यात त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून सुद्धा कारभार पाहिला आहे. त्यामुळे या दोन उमेदवारांची राजकीय कारकीर्द पाहता राणे यांनी शहरी व ग्रामीण भागात राजकीय प्रवासाला सुरुवात केलेली नाही. सावंत हे ग्रामीण नेतृत्व आहे.

ग्रामीण मतदारांची संख्या जास्त
जिल्ह्याचा विचार केल्यास या जिल्ह्यात आठ तालुके आहेत. सर्व तालुका ठिकाणी नगरपालिका आहेत. तर आठ पंचायत समिती असून पूर्ण जिल्ह्यात 50 जिल्हा परिषद मतदार संघ आहेत. जिल्ह्यात या निवडणुकीला 6 लाख 70 हजार 583 मतदार आहेत. जिल्ह्यात आठ नगरपरिषद असल्या तरी जिल्ह्यातील एकूण मतदारांमध्ये शहरा पेक्षा ग्रामीण भागातील मतदार मोठ्या संख्येने आहेत. अर्थात शहरी आणि ग्रामीण उमेदवार बघून मतदान होणार नाही. दोन्ही भागांमध्ये सारखीच चुरस पाहायला मिळेल, असे चित्र आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 Urban versus Rural leadership competition in Sindhudurg