Vidhan Sabha 2019 : विनोद तावडे म्हणाले, कणकवलीचा इतिहास बदला 

Vidhan Sabha 2019 : विनोद तावडे म्हणाले, कणकवलीचा इतिहास बदला 

वैभववाडी - कणकवली विधानसभा मतदारसंघात कायम सत्तेच्या विरोधातील आमदार राहिला आहे. हे समीकरण आता बदलले पाहिजे. ज्या पक्षाचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा कणकवलीचा आमदार असायला पाहिजे, असे स्पष्ट करतानाच कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या, असे आवाहन उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येथे केले. 

भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांच्या प्रचारार्थ एडगाव येथील सुमित्रा कार्यालयात आज विजय संकल्प मेळावा झाला. याला मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आमदार नीतेश राणे, प्रमोद जठार, अजित गोगटे, सुभाष मयेकर, सुषमा खानोलकर, राजेंद्र राणे, अरविंद रावराणे, प्रणिता पाताडे, राजश्री धुमाळे, भालचंद्र साठे, नासीर काझी, दिलीप रावराणे, सुधीर नकाशे आदी उपस्थित होते. 

श्री. तावडे म्हणाले, ""संपूर्ण स्वाभिमान पक्ष आणि भाजप एकत्र झाले आहेत. त्यामुळे आता कोकणात भाजपाची ताकद वाढणार आहे. ही ताकद वाढताना जुने - नवे वाद होता कामा नये. प्रत्येक कार्यकर्त्याने बूथनिहाय नियोजनपूर्वक दिलेले काम चोखपणे करणे आवश्‍यक आहे. ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवर नसुन मोदी - शहा देशांसाठी करीत असलेल्या कामांवर लढविली जाणार आहे हे कार्यकर्त्यानी लोकांनी पटवुन दिले पाहिजे.'' 

श्री. दरेकर म्हणाले, ""देशात आणि राज्यात भाजपच्या माध्यमातून विकासगंगा घरोघरी पोचत आहे. सिंधुदुर्ग त्यामध्ये मागे राहता कामा नये. जिल्ह्यात विशेषतः कणकवली विधानसभा मतदारसंघात सहकारी तत्त्वावर स्वंयरोजगार उभे करण्यासाठी मुंबई बॅंकेच्या माध्यमातून अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. जर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सहकारी किंवा खासगी साखर कारखाना उभारणार असाल तर त्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. जिल्ह्यांसाठी 500 कोटींचे कर्ज उपलब्ध करून दिले जाईल; परंतु येथील तरुणांनी रोजगारांकडे वळणे आवश्‍यक आहे. पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेचा अध्यक्ष भाजपच असेल.'' 

आमदार राणे म्हणाले, ""शिवसेनेचा उमेदवार जिल्हा बॅंकेचा वापर स्वतःच्या प्रचारासाठी करीत असून लोकांना धमकावण्याचे काम करीत आहे. आपण प्रचारादरम्यान कुणावरही टीका करणार नाही. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर लढणार आहे.'' 

"नाणारसाठी'च राणेंशी तडजोड 
"नाणार'मुळे जिल्ह्यातील एक दोन लाख तरुणांना रोजगार मिळणार आहे. हा विकास साधण्यासाठीच राणेंशी तडजोड केली असल्याचे मत जिल्हाध्यक्ष जठार यांनी व्यक्त केले. आमदार राणे हे छोटे भाऊ आहेत. त्यामुळे आम्ही खांद्याला खांदा लावून काम करणार असून विरोधकांना खांदा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा जठार यांनी विरोधकांना दिला. 

सर्व दरवाजे आता बंद 
आजच्या सभेत "स्वाभिमान'चे भाजपवासी झालेले भालचंद्र साठे यांनी पक्षात नवीन आहोत. नवीन घरात गेल्यानंतर कोणता दरवाजा कुठे उघडतो, बाहेर जाण्याचा मार्ग कुठला हे शोधण्यात थोडा वेळ जातो, असे म्हणताच श्री. राणे यांनी आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत, अशी मिश्‍किल टिप्पणी केली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com