Vidhan Sabha 2019 : कणकवलीत राणेंच्या विरोधात कोण ?

राजेश सरकारे
रविवार, 22 सप्टेंबर 2019

कणकवली - कणकवली मतदारसंघात विद्यमान आमदार नीतेश राणे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण? याबाबतची प्रतीक्षा कार्यकर्त्यांसह मतदारांना लागून राहिली आहे. युती न झाल्यास राणेंना कडवी लढत देण्यासाठी शिवसेनेकडून तगड्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. याखेरीज कणकवली मतदारसंघात आपल्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व वंचित आघाडीकडूनही सक्षम उमेदवारांचा शोध सुरू आहे.

कणकवली - कणकवली मतदारसंघात विद्यमान आमदार नीतेश राणे यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण? याबाबतची प्रतीक्षा कार्यकर्त्यांसह मतदारांना लागून राहिली आहे. युती न झाल्यास राणेंना कडवी लढत देण्यासाठी शिवसेनेकडून तगड्या उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. याखेरीज कणकवली मतदारसंघात आपल्या पक्षाची ताकद दाखविण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व वंचित आघाडीकडूनही सक्षम उमेदवारांचा शोध सुरू आहे.

कणकवलीचे विद्यमान आमदार नीतेश राणे हे सध्या काँग्रेस पक्षात आहेत. लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल आणि तेच भाजपचे उमेदवार असतील, असे खासदार नारायण राणेंनी जाहीर केलेय; पण भाजप जिल्हाध्यक्षांनी मात्र राणेंची उमेदवारी निश्‍चित झाली नसल्याचा खुलासा केलाय. शिवसेना पक्षाकडून कणकवलीसाठी सद्यःस्थितीत जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी त्याअनुषंगाने गेली चार वर्षे कणकवली मतदारसंघात पक्ष बांधणी देखील केली आहे. त्याचबरोबर राणेंना टक्‍कर देण्यासाठी त्यांच्याच स्वाभिमान पक्षातील एक बडा नेता शिवसेनेत आणता येईल का? याचीही चाचपणी शिवसेनेकडून सुरू आहे.

याखेरीज भाजपमध्ये नाराज असलेल्या एका नेत्याने शिवसेना पक्षाशी जवळीक ठेवली आहे. शिवसेना नेते आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातही या नेत्याने आदित्य ठाकरेंचे स्वागत केले होते. या नेत्याला देखील शिवसेना पक्षात आणून राणेंना तोडीस तोड उमेदवार ठरू शकेल का? याबाबतही शिवसेना पक्षाकडून चाचपणी केली जात आहे. राणेंनी काँग्रेस पक्ष संघटनेचा त्याग केल्यानंतर कणकवली मतदारसंघात काँग्रेस खिळखिळी झाली आहे. तरीही पक्ष संघटनेला पुन्हा उभारी देण्यासाठी काँग्रेसचे सुशील राणे हे निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तर राष्ट्रवादी पक्षाकडून नगरसेवक अबिद नाईक यांचे नाव आघाडीवर आहे. याखेरीज वंचित आघाडीकडूनही उमेदवाराचा शोध सुरू आहे.

थांबा व पहा..
कणकवली मतदारसंघात भाजपकडून नीतेश राणे उभे राहिले तर शिवसेना आपला उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केलीय. तसे झाल्यास कणकवली मतदारसंघात चौरंगी लढतीची अपेक्षा आहे. कणकवलीत भाजपकडून संदेश पारकर आणि अतुल रावराणे यांनी आपला उमेदवारीवरील दावा कायम ठेवला आहे. राणेंना भाजपत घेण्याची गरज नाही. आम्ही कणकवलीची लढाई जिंकून दाखवू, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय; मात्र भाजप पक्ष नेतृत्वाने थांबा व पहा असे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे कणकवलीत भाजपचा उमेदवार नीतेश राणे, संदेश पारकर आणि अतुल रावराणे यामधून निश्‍चित होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 who will fight againt Rane in Kankavali