Vidhan Sabha 2019 : शिवसेनेपुढे आव्हान पक्षांतर्गत नाराजीचे

शिरीष दामले
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला ठेवून काम केले. लोकसभेअंतर्गत पाचही विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेला मताधिक्‍य मिळाले; मात्र विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदारसंघच न सोडल्याने भास्कर जाधव यांच्या उमेदवारीमुळे आणि स्थानिक उमेदवार हवा यासाठी नाराजी आहे, त्याचे शिवसेनेपुढे आव्हान असेल.

रत्नागिरी जिल्हा - विधानसभा 2019 
जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार निश्‍चित झाले. रत्नागिरी वगळता चारही ठिकाणी या वेळी शिवसेनेला संघर्ष करावा लागणार हे नक्की. राजापूर मतदारसंघात स्थानिक उमेदवार हवा म्हणून उघड बंडाळी झाली. राजन साळवींना विरोध करत काहींनी राजीनामे दिलेत, त्यामुळे तेथे शिवसेनेला सावध राहावे लागेल. चिपळूण- संगमेश्‍वर मतदारसंघात संगमेश्‍वरमध्ये शिवसेनेअंतर्गत नाराजी आहे. येथे राष्ट्रवादीचा उमेदवार ताकदीचा आहे. तालुक्‍यात शिवसेना, भाजपमध्ये सख्य नाही. गुहागर आणि दापोली मतदारसंघात भाजपच्या नाराजांनी दंड थोपटलेत, त्यामुळे युतीधर्माचे काय, याचे उत्तर अनिश्‍चित आहे. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशामुळे इच्छुकांना दणका बसलाय. यातील जिल्हाप्रमुख सचिन कदम गप्प आहेत; मात्र सहदेव बेटकरांनी राष्ट्रवादीची टोपी चढवत जाधवांना टक्कर द्यायची तयारी सुरू केली. गुहागरात भाजपला उमेदवारी हवी असल्यामुळे या पक्षातच मोठी नाराजी आहे. ज्या जाधवांविरोधात पाच वर्षे ओरड करीत काम केले, त्यांची पालखी उचलायची का, हा शिवसैनिकांपुढील पेच आहे. 

सर्वाधिक डोकेदुखी दापोली-मंडणगडमध्ये आहे. तेथे रामदास कदम विरुद्ध सूर्यकांत दळवी यांच्यातील पक्षांतर्गत वादाचा मोठा फटका बसू शकतो. गुहागर, दापोली, चिपळूण मतदारसंघांत भाजपच्या नाराजीचा फटका बसू शकतो. ओबीसी, कुणबी समाजाला जिल्ह्यात उमेदवारी हवी होती. कुणबी अस्मितेची ठिणगी दापोलीतून फुलत चालली आहे. कदमांचे पुत्र उभे राहिलेले असताना कुणबी समाजाचा प्रतिनिधी हवा, अशी मागणी शिवसेनेतून होत आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दोन मतदारसंघांत निवडणूक लढवण्याची भाषा केली होती, प्रत्यक्षात ते रिंगणात उतरले नाहीत; मात्र त्यांची नाराजी कमी झालेली नाही. युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाल्याने जिल्ह्यातील भाजप कार्यकर्ते प्रचार करणार की नाराजी प्रकट करणार, याचे उत्तर लवकरच मिळेल. आघाडीपैकी काँग्रेस जिल्ह्यात दुबळा आहे. राष्ट्रवादीला गुहागरमध्ये धक्का बसला. मात्र चिपळूण व दापोलीमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसची मदत होईल. शिवाय, शिवसेनेतील नाराजांची मतेही तेथे महत्त्वाची ठरतील.

राजकीय चित्रही पालटू शकते
गेली तीन वर्षे कुणबी समाजाच्या अस्मितेला फुंकर घातली गेली. जिल्ह्यात मोठी चळवळ उभी राहते आहे. हा समाज खरोखरच एकवटला आणि त्याने निवडक उमेदवारांना पाठिंबा दिला तर जिल्ह्यातील राजकीय चित्रही बदलू शकते. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेला गुहागर, चिपळूण, दापोली येथे मोठा प्रतिसाद मिळाला. डॉ. अमोल कोल्हे यांना पाहण्यासाठी ही गर्दी झाली होती, की पक्षप्रेम वाढते आहे हे निवडणुकीत स्पष्ट होईल.

नाराजी वाढू शकते
शिवसेनेने दापोलीतून योगेश कदम, चिपळुणातून सदानंद चव्हाण, गुहागरमधून भास्कर जाधव, राजापुरातून राजन साळवी आणि रत्नागिरीतून उदय सामंत यांची उमेदवारी निश्‍चित केली. राजापूरमध्ये स्थानिक उमेदवाराची, तर इतरत्र ओबीसी वा कुणबी समाजातील उमेदवार देण्याची मागणी किमान दापोली व गुहागर येथे शिवसेनेने विचारात घेतलेली नाही. येथे नाराजीचा फटका बसू शकतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha Shiv Sena will have to fight in ratnagiri district