सर्वांना सोबत घेऊन शिवसेना वाढविणार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

भाईसाहेब सावंत यांच्या घराण्याचा वारसा मला लाभला आहे. आजोबांनी आणि वडिलांनी नेहमी समोरच्या व्यक्तीशी आदराने बोलावे, त्यांचा आदर करावा ही शिकवण मला दिली. त्याप्रमाणे येणाऱ्या काळात शिवसेना बळकट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. एका महिन्यानंतर संपूर्ण सावंतवाडी भगवामय दिसेल. सर्व वरिष्ठ नेत्यांना विश्‍वासात घेऊन व सर्वांना सोबत घेऊन संघटनावाढीचे काम करणार आहे. 
- विक्रांत सावंत

सावंतवाडी : कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता मी शिवसेनेत आलो आहे. भविष्यात संघटना वाढवायची आहे. यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करेन, असा विश्‍वास शिवसेनेचे युवा कार्यकर्ते विक्रांत सावंत यांनी आज येथे व्यक्त केला. 

कॉंग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर श्री. सावंत आज आपल्या कार्यकर्त्यासह सावंतवाडीत दाखल झाले. या वेळी तालुका शिवसेना शाखेतर्फे यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. या वेळी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, तालुका संपर्कप्रमुख राजू नाईक, शब्बीर मणियार, चंद्रकांत कासार, मायकल डिसोझा, प्रशांत कोठावळे, अशोक दळवी, दिनेश सावंत आदी उपस्थित होते. 

या वेळी तालुका प्रमुख राऊळ म्हणाले,''श्री. सावंत यांच्या शिवसेना प्रवेशामुळे संघटनावाढीसाठी फायदा होणार आहे. सावंत हे युवक असल्यामुळे युवावर्ग शिवसेनेकडे आकर्षित होणार आहे. त्यांच्या माध्यमातून युवकांचे विविध प्रश्‍न सोडविले जातील तसेच संघटना वाढीसाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे.'' 

या वेळी तालुक्‍यातील शिवसेना कार्यकर्त्याच्या वतीने सावंत यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी एकनाथ नारोजी, गुणाजी गावडे, हेलन निब्रे, कीर्ती बोंद्रे, विश्‍वास घाग आदी उपस्थित होते. 

Web Title: Vikrant Sawant enters Shiv Sena in Sawantwadi