एका धबधब्याने बदलले गाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

दोडामार्ग - सह्याद्रीच्या उंच रांगात, राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या मांगेलीचे नशीब पावसाळ्यात अवतरणाऱ्या एका धबधब्याने बदलले आहे. वर्षा पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणाऱ्या मांगेलीत पर्यटनामुळे पक्‍का रस्ता पोचला. पर्यटक वाढू लागल्याने गावाच्या उत्पन्नातही भर पडून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. 

दोडामार्ग - सह्याद्रीच्या उंच रांगात, राज्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या मांगेलीचे नशीब पावसाळ्यात अवतरणाऱ्या एका धबधब्याने बदलले आहे. वर्षा पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येणाऱ्या मांगेलीत पर्यटनामुळे पक्‍का रस्ता पोचला. पर्यटक वाढू लागल्याने गावाच्या उत्पन्नातही भर पडून रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. 

मांगेली म्हणजे निसर्गाचा सुंदर आविष्कार. मांगेलीच्या पूर्वेला उत्तर दक्षिण आणि दक्षिणेला दक्षिण पश्‍चिम असा पसरलेला उंचचउंच सह्याद्रीचा डोंगरकडा. पावसात तर तो हिरव्याकंच निसर्ग संपदेने बहरून आलेला. मांगेली फणसवाडीत कर्नाटकमधील कड्यावरून कोसळणारा पांढऱ्या शुभ्र पाण्याचा प्रपात निसर्गसौंदर्यात भर घालतो. तो थोरला असला तरी त्याच्या पाठीवरचे आणखी अनेक छोटे छोटे जल प्रपात अगदी रांगेने तळेवाडीपर्यंत आपले अस्तित्व दाखवत वाहणारे. दाट धुके, गार वारा, डोळ्यांना सुखावणारी वाऱ्यासोबत डोलणाऱ्या झाडा-झुडपांची हिरवी लवलव, गारठलेल्या जंगलामधून वळणदार गिरक्‍या घेत जाणारी काळीकभिन्न डांबरी सडक सारेच कसे हवेहवेसे वाटते.

साधारण दहा वर्षापूर्वी इथला निसर्ग असाच समृद्ध होता; मात्र गाव कोणाच्या गणतीत नव्हता. येथे पक्‍की सडक पोचली नव्हती. अल्प लोकसंख्या असल्याने रस्त्यासह इतर सुविधा येथे पोचणे म्हणजे स्वप्नच होते. याच काळात आंबोलीचे वर्षा पर्यटन बहरत होते. 

प्रसार माध्यम आणि काही हौशी पर्यटकांमुळे आंबोली बरोबरच मांगेलीचे नाव वर्षा पर्यटनासाठी पुढे आले. गोवा, कर्नाटकसह महाराष्ट्रातील पर्यटकांपर्यंत मांगेलीची कीर्ती पोचली. आणि इथल्या एका धबधब्याने मांगेलीचे रूपच पालटले. 

हंगामात हजारो पर्यटक येऊ लागले. पर्यटन कर, पार्किंगसाठी पैसे यातून गावाला सार्वजनिक हिताच्या कामासाठी स्वतःचा निधी मिळू लागला आहे. हॉटेलिंग व इतर पर्यटनपूरक व्यवसायातून दहा ते पंधरा कुटुंबांना रोजगार मिळाला आहे. दरवर्षी यात वाढ होत असून, येथील लोकजीवनही अधिक समृद्ध झाले आहे. सध्या हा धबधबा पूर्ण क्षमतेणे वाहत असून, गर्दीही वाढली आहे. पावसाळ्यात कोसळणाऱ्या सहस्रधारांच्या खाली उभं राहून सचैल स्नान करायचं असेल, जीवनातील धकाधकीतून थोडा विरंगुळा आणि निसर्गाशी सुखसंवाद साधायचा असेल तर मांगेलीत यायलाच हवं.

वर्षा पर्यटनात ट्रेकिंगची मजा
मुख्य रस्त्यापासून धबधबा थोडा दूर आहे. धबधब्यावर जाण्यासाठी टेकडी चढून जावे लागते. चढ उताराचा रस्ता निसरडा, दगड धोंड्याचा आहे. काहीवेळा पाय घसरून पडण्याची भीती असली तरी अनेकांना तसल्या पायवाटेवरून चढण्याउतरण्यात मौज वाटते. अनेक पर्यटक त्यातून ट्रेकिंगचा अनुभव घेतात.

Web Title: village change by waterfall