गावठाणांचे ड्रोन भूमापन दृष्टीक्षेपात 

village drone survey konkan sindhudurg
village drone survey konkan sindhudurg

ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गातील 32 गावठाणांच्या ठिकाणी शासनाच्या स्वामित्व योजनेंतर्गत ड्रोनद्वारे भूमापन केले जाणार आहे. तेथील रहिवाशांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीचे नियोजन सुरू झाले आहे. याचाच भाग म्हणून गावठाण भूमापन यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीच्या सभेत केले. 

ड्रोनद्वारे गावठाण भूमापन सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी तथा समिती अध्यक्षा सौ. मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी सभागृहात घेण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, समिती सचिव तथा जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक डॉ. विजय वीर, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील, भूमि अभिलेख कणकवली उप अधीक्षक डॉ. सौरभ तुपकर, प्रियदा साकोरे गटविकास अधिकारी उपस्थित होते. यावेळी अधीक्षक डॉ. वीर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक डॉ. तुपकर व श्रीमती साकोरे यांनी पीपीटी सादर केली. 

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांनी ड्रोनद्वारे गावठाण भूमापन करताना तेथील ग्रामस्थांना विश्‍वासात घेण्याचे आवाहन केले. अधीक्षक डॉ. वीर यांनी भारतीय सर्व्हेक्षण विभाग, भूमि अभिलेख व ग्राम विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यात ग्रामसेवक व तलाठी यांची भूमिका महत्वाची आहे. यासाठी शासनाने गावस्तरावर मंडल अधिकारी, तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली आहे. ही समिती या कामावर नियंत्रण ठेवणार आहे, असे सांगितले. 

योजनेचे फायदे 
सध्या गावठणात राहणाऱ्या रहिवाशांकडे मालमत्तांबाबत कोणतेच कागदपत्र नाहीत. त्या जमिनी शासनाच्या नावे आहेत. या प्रक्रियेमुळे शासनाच्या मिळकतींचे संरक्षण होईल. मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमा निश्‍चित होतील. रहिवाशांच्या मालकी हक्काचे अभिलेख व मिळकत पत्रिका तयार होणार आहेत. सीमा निश्‍चिती झाल्याने सरकारी मिळकतींवरचे अतिक्रमण रोखता येणार आहे. मिळकतींना बाजारपेठेत तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावणार आहे. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मूलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होणार. पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी. कामात पारदर्शकता व अचूकता. थ्री डी इमेज प्राप्त होत असल्याने विविध विकास यंत्रणा व विभागाना नियोजन करताना सुलभता येणार आहे. 

...ही आहेत गावठाणे 
कुडाळ तालुक्‍यातील पाट, अणाव, सावंतवाडी तालुक्‍यात चौकुळ, मासुरे, नेने, गाळे, केगद, फणसवडे, कलंबिस्त. दोडामार्ग तालुक्‍यात मोर्ले, घोटगेवाडी, वझरे. कणकवली तालुक्‍यात पियाळी, माईन, नागवे, लोरे, करंजे, दिगवळे, हुमरठ. देवगड तालुक्‍यात रेंबवली, लिंगडाळ, वरेरी, तोरसोळे, किंजवडे, धालावली. मालवण तालुक्‍यात त्रिंबक, सडेवाडी, पिरावाडी, कट्टा, बगाडवाडी, धामापुर, अपराधवाडी या 32 गावांत गावठाण आहे. वैभववाडी व वेंगुर्ले तालुक्‍यात एकही गावठाण क्षेत्र नाही. 

काय साध्य होणार ? 
गावठाणातील मालमत्ताचे जीआयएस आधारित रेखांकन व मूल्यांकन करणे. गावठाणातील प्रत्येक घराचा नकाशा तयार करणे. गावठाणातील प्रत्येक खुल्या जागेचा, रस्त्याचा नकाशा करणे. गावठाणातील प्रत्येक घर, खुली जागा, रस्ता, गल्ली, नाला यांना भूमापन क्रमांक देणे. प्रत्येक मिळकतीची महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 च्या तरतूदीनुसार मिळकत पत्रिका तयार करणे व त्याचे वाटप करणे. गावातील मालमत्ता कर (नमूना क्रमांक 8) अद्यावत व ते जीआयएस लिंक करणे. गावातील ग्राम पंचायतींचे व शासनाचे असेट रजिस्टर तयार करणे, ही ड्रोन भूमापनचे उद्देश आहे. 

जिल्ह्यात 32 गावांत गावठाण क्षेत्र आहे. त्याची माहिती घेतली आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात अन्य गावठाण क्षेत्र असल्यास उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधावा. जिल्ह्यात अजुन गावे किंवा क्षेत्र मिळाल्यास त्याचाही समावेश यात करता येईल. 
- डॉ. विजय वीर, जिल्हा भूमि अभिलेख अधीक्षक. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com