विकासासाठी गावचा आराखडा हवा - राऊत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 डिसेंबर 2016

देवगड - ‘गावाच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला, तर ग्रामीण विकासाला गती येईल. समस्या टप्प्याटप्प्याने सुटून एक आदर्श गाव उभे राहील,’ असे मत खासदार विनायक राऊत यांनी आज फणसे (ता. देवगड) येथे व्यक्‍त केले. या वेळी जनसुविधेमधून ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासनही श्री. राऊत यांनी दिले.

देवगड - ‘गावाच्या विकासासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला, तर ग्रामीण विकासाला गती येईल. समस्या टप्प्याटप्प्याने सुटून एक आदर्श गाव उभे राहील,’ असे मत खासदार विनायक राऊत यांनी आज फणसे (ता. देवगड) येथे व्यक्‍त केले. या वेळी जनसुविधेमधून ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासनही श्री. राऊत यांनी दिले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून फणसे गावातून समुद्राकडे जाणाऱ्या रस्ताकामाचे भूमिपूजन श्री. राऊत यांच्या हस्ते झाले. यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. या वेळी सरपंच अनामिका फणसेकर, उपसरपंच आरती गांवकर, शिवसेना जिल्हा उपप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख ॲड. प्रसाद करंदीकर, पंचायत समिती सदस्य सुनील तिर्लोटकर, वर्षा पवार, सुनील जाधव, ग्रामपंचायत सदस्या स्मिता केळकर, लिना तांबे, ग्रामसेवक उज्ज्वल झरकर, संदीप डोळकर यांच्यासह अन्य उपस्थित होते. 

श्री. राऊत म्हणाले, ‘‘गावचा विकास होण्यासाठी अभ्यासपूर्ण आराखडा तयार करण्याची गरज आहे. यातून गावचा सर्वांगीण विकास साधता येतो. कोकणातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रसंगी वेगळे शासन अध्यादेश काढून त्यातून मार्ग काढला जात आहे. सिंधुदुर्गातील साकव दुरुस्तीसाठी सुमारे १६ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. विजेचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लागण्यासाठी प्रयत्न आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या जोडण्या देण्यासाठी प्रयत्न आहेत. ग्रामपंचायती ऑनलाइन जोडल्यानंतर कामाला वेग येऊन विकासाची गती वाढेल. रस्त्यांची कामे करताना ग्रामस्थांना समाधान देणारे काम होण्याची गरज आहे. त्यामुळे होणारे काम दर्जेदार होण्याकडे कटाक्ष राहील. जनसुविधेमधून ग्रामपंचायत इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच गरज पडल्यास खासदार निधी दिला जाईल.’’

किनारपट्टीवर टॉवर उभारणार
जिल्ह्यातील विविध भागांतील नागरिकांच्या सोयीसाठी बीएसएनएलचे टॉवर वाढवण्यात येतील. मच्छीमारांना समुद्रात सुमारे १२ सागरी मैल अंतरापर्यंत मोबाइल रेंज मिळण्यासाठी किनारपट्टीलगत टॉवर उभारण्याचा विचार असल्याचे विनायक राऊत यांनी या वेळी सांगितले.

Web Title: village planning for development