संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्याला बांधले जगबुडी पुलाला

संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्याला बांधले जगबुडी पुलाला

खेड - जगबुडी नवीन पुलाच्या जोड रस्त्याला भगदाड पडल्यानंतर संताप उसळला होता. यावेळी मोठ्या प्रमाणावर मनसे व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमा झाले होते. तेथे आलेल्या अभियंता आणि महामार्गाचे अधिकारी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे कार्यकर्ते अधिकच संतापले. त्यांनी एका अधिकाऱ्याला नवीन पुलालाच बांधून ठेवले. तर दुसऱ्याला दर्डावले. यामुळे बाका प्रसंग ओढवला होता. वरिष्ठ अधिकारी व पोलिस आल्यावर हा तणाव निवळला. मात्र याबबत खेड पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नाही. 

मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीवरील नवी पुलाचा जोड रस्ता खचल्याने काल मनसे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. त्याचवेळी महामार्गाचे अधिकारी बामणे तसेच अभियंता गायकवाड हे दोघे अधिकारी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते.

यावेळी हा प्रकार घडला. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या अधिकाऱ्यांना या निकृष्ट कामाबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. जर अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या तसेच रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या अधिकाऱ्यांना नवीन पुलावरच दोरीने मनसेच्या कार्यकर्त्यांनी थोडा वेळ बांधून ठेवले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरील खड्यात वृक्षरोपणही केले.

रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिस्थिती लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील यांनी मध्यस्थी करून महामार्ग वाहतुकीस मोकळा केला. यावेळी आमदार संजय कदम, नगराध्यक्ष वैभव खेडेकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, तालुकाध्यक्ष स. तु. कदम, मनसेचे विश्‍वास मुधोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो त्यामुळे जुना जगबुडीवरचा पूल वाहतुकीस बंद ठेवून नवीन पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येणार होती. परंतु वाहतूक सुरू होण्याआधीच जोड रस्ता खचल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, खेड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की महामार्गाच्या कोणाही अधिकाऱ्यांनी तक्रार दिलेली नाही. त्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. 

केंद्राचे पथक पाहणी करणार 
नगराध्यक्ष वैभव खेडेकर म्हणाले, ""उद्या 1 जुलैपासून या नवीन पुलाच्या जोड रस्ता तसेच अन्य कामे या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सुरू होणार आहेत. कामात हलगर्जीपणा होणार नाही, दर्जेदार काम होईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे. पुलाचे काम झाल्यानंतर केंद्र सरकारचे दक्षता पथक कामाची पाहणी करणार आहे. त्यांनी कामाचा दर्जा चांगला असल्याचे प्रमाणपत्र दिल्यानंतरच हा पूल वाहतुकीस सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com