गावकऱ्यांनीच उभारले अंगणवाडीचे छप्पर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 जुलै 2016

शासकीय मदतीची वाट पाहण्याऐवजी मुलांची गरज ओळखून आणि परिस्थितीचे भान ठेवत सामाजिक बांधिलकीतून आंबेवाडी ग्रामस्थांनी स्वनिधीतून इमारतीच्या छपराचे काम पूर्ण केले. याचे श्रेय सर्व ग्रामस्थांचे आहे.
- संतोष नवाळे, सामाजिक कार्यकर्ते.

राजापूर : कोणत्याही सार्वजनिक सोयीसुविधेसाठी शासनाच्या मदतीवर विसंबून राहिल्यास ते काम लालफितीत अडकून राहते. हे लक्षात घेऊन विलंब टाळण्यासाठी शहरानजीकच्या आंबेवाडी येथील ग्रामस्थांनी वादळग्रस्तांना तत्काळ मदत करण्यासाठी निधी उभारला आणि श्रमदानही केले. यामुळे गाव करील ते राव काय करील या म्हणीचा प्रत्यय आला.
 

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या आंबेवाडी येथील अंगणवाडीच्या छपराची दुरुस्ती गावातच निधी उभारून आणि श्रमदान करून ग्रामस्थांनी केली. अंगणवाडीच्या छपरावर पत्रे टाकले. आज या इमारतीमध्ये अंगणवाडी भरली होती. दोन दिवसांपूर्वी तालुक्‍यातील काही गावांना वादळाचा तडाखा बसला होता. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील सागवे, हातिवले या गावांसह शहरानजीकच्या आंबेवाडीचा समावेश होता. आंबेवाडी येथील अंगणवाडीच्या इमारतीच्या छपरावरील पत्रे उडून गेले होते. वाडीतील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्‍न लक्षात घेऊन येथील ग्रामस्थांनी छप्पर स्वत:च उभारण्याचा निर्णय घेतला. काल (ता. 3) दिवसभर वाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन निधी जमा केला तसेच श्रमदान करून इमारतीवर पत्रे टाकले. एखादी शासकीय इमारत वा सार्वजनिक रस्त्याचे काम होण्यासाठी ग्रामस्थ शासन यंत्रणा हलेल म्हणून वाट पाहत बसतात. याला आंबेवाडी येथील ग्रामस्थ अपवाद ठरले. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये नेहमी उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या आंबेवाडी ग्रामस्थांच्या या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

 

Web Title: villeagers built anganwadi roof