कॉंग्रेसला दुर्बिणीने शोधावे लागेल - विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

जुन्या कॉंग्रेसने नव्हे, तर आताच्या कॉंग्रेसने जिल्ह्याची ओळख खाबूगिरीचा जिल्हा अशी केली. जातील तिथे त्यांची ही वृत्ती पुढे आली. मागच्या वेळेला ज्याला निवडून दिले तेही खादाडांच्याच कंपूत गेले.

दोडामार्ग - कॉंग्रेसच्या कंपूने जिल्ह्यात आणलेल्या झोडा फोडा संस्कृतीला गेल्या दोन-अडीच वर्षांत शिवसेनेने मूठमाती दिली आणि जिल्ह्यात शांतता व निर्भयता प्रस्थापित केली. त्यामुळे येत्या काही वर्षांत श्री. राणे आणि त्यांच्या कंपूची कॉंग्रेस जिल्ह्यात कुठे दिसते का हे दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी आज येथे लगावला. येथील शिवसेना प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

या वेळी कणकवली तालुका संपर्कप्रमुख प्रभाकर पार्सेकर, दोडामार्ग तालुका सहसंपर्कप्रमुख अप्पा धाऊसकर, जिल्हा बॅंक संचालक प्रकाश परब, जिल्हा उपप्रमुख एकनाथ नारोजी व गणेशप्रसाद गवस, युवासेना जिल्हा उपप्रमुख सागर नानोसकर, तालुकाप्रमुख बाबूराव धुरी, पांडुरंग नाईक आदी उपस्थित होते. 

श्री. राऊत म्हणाले, ""जुन्या कॉंग्रेसने नव्हे, तर आताच्या कॉंग्रेसने जिल्ह्याची ओळख खाबूगिरीचा जिल्हा अशी केली. जातील तिथे त्यांची ही वृत्ती पुढे आली. मागच्या वेळेला ज्याला निवडून दिले तेही खादाडांच्याच कंपूत गेले.'' 

शिवसेनेतून निवडून आल्यावर कॉंग्रेसमध्ये गेलेल्या एकनाथ नाडकर्णी व आनंद रेडकर यांच्यावर नाव न घेता त्यांनी टीका केली. आता त्या सगळ्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. आता आपल्याला भगवे तेज पुन्हा उभे करायचे आहे याची जाणीव ठेवून काम करा असे त्यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ""जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, जिल्हाध्यक्ष तथा आमदार वैभव नाईक व मी मिळून जिल्ह्याचा विकास कसा करायचा याबाबत एकत्रितपणे काम करत आहोत. जिल्ह्यातील सकारात्मक बदलाची चांगली फळे दिसू लागली आहेत. त्यामुळे चांगली चांगली माणसे शिवसेनेत प्रवेश करताहेत. गेल्या दोन-अडीच वर्षांत शिवसेनेने जिल्ह्यात चांगले काम केले आहे. श्री. राणे व त्यांच्या कंपूचे झोडा, तोडा, फोडा, मारा असे राजकारण सुरू होते. ते संपवून जिल्ह्यात शांतता व निर्भयता आणण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे. तालुक्‍यात शिवसेनेला शंभर टक्के यश देण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करा.'' 

ए, बी फॉर्मबरोबर पाकिटाच्या थापा 
शिवसेनेत येणाऱ्यांना आमिषे दाखवावी लागत नाहीत. शिवसेनेत आलात तर तुम्हाला ए, बी फॉर्म देऊ, त्यासोबत आणखी एक "पाकीटही' देऊ अशा थापा आम्ही मारत नाहीत. शिवसेनेने तसा बाजार कधी मांडला नाही. अटी-शर्ती आणि आमिषेही आम्ही देत नाही. ज्यांना शिवसेनेची ध्येयधोरणे, विचार पटतात, शिवसेना ही संघटना व परिवार आहे असे पटते तेच शिवसेनेत येत आहेत असेही श्री. राऊत म्हणाले.

Web Title: vinayak raut criticize congress