मनोमिलन-शक्तिप्रदर्शनाने राऊतांचा अर्ज

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मार्च 2019

रत्नागिरी - कोअर कमिटीच्या सुमारे दीड ते दोन तासांच्या ताणाताणीनंतर सेना-भाजपचे अखेर मनोमिलन झाले. खांद्याला खांदा लावून युतीचे काम करण्याच्या आणाभाका भाजप-सेनेच्या नेत्यांनी मेळाव्यात घेतल्या. त्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साह संचारला.

रत्नागिरी - कोअर कमिटीच्या सुमारे दीड ते दोन तासांच्या ताणाताणीनंतर सेना-भाजपचे अखेर मनोमिलन झाले. खांद्याला खांदा लावून युतीचे काम करण्याच्या आणाभाका भाजप-सेनेच्या नेत्यांनी मेळाव्यात घेतल्या. त्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साह संचारला. महायुतीने भव्य रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन करून विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला.

युतीची घोषणा झाल्यानंतर राज्यात संभ्रमाचे वातावरण होते. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थितीही तीच होती. युतीला प्रचंड विरोध झाला. उमेदवार बदलण्यापर्यंतच्या चर्चा झाल्या. त्यामुळे सेना-भाजप यांच्यात लोकसभा मतदारसंघात जुळेल, असे वाटत नव्हते. प्रचंड दुही निर्माण झाली होती. भाजपचे पदाधिकारी उघड-उघड विरोध करत होते. बैठका झाल्या, परंतु मुख्यमंत्री जोवर सांगत नाहीत, तोवर आम्ही युतीचे काम करणार नसल्याचे काहींनी स्पष्ट केले.

कोल्हापूर येथील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी युतीचे काम करण्याचे सर्वांना आदेश दिले, तरी मने जुळण्यात अडचणी होत्याच. आज विनायक राऊत उमेदवारी अर्ज भरणार होते. त्यापूर्वी मराठा मैदानावर मेळावा घेतला. या मेळाव्यातून युती घट्ट आणि मनोमिलन झाल्याचे प्रदर्शन करावयाचे होते. स्वयंवर मंगल कार्यालयात सेना-भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यामध्येही ताणाताणी झाली. अकराचा मेळावा पाऊण वाजले तरी सुरू झाला नव्हता. अखेर बैठकीत एकमत झाले आणि व्यासपीठावर सेनेबरोबर भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी 
दिसले, तेव्हा मनोमिलन झाल्याचा संकेत मिळाला.   

२०१४ ची पुनरावृत्ती करणार

कोअर कमिटीच्या बैठकीत नव्या संकल्पनेने पुढे जाण्याचा निर्णय झाला. २०१४ ची या निवडणुकीत पुनरावृत्ती करायची आहे. चार ते पाच वर्षांमध्ये स्वतंत्र लढल्यामुळे काही प्रश्‍न निर्माण झाले. मात्र आता सर्वांनी मिळून सेनेचे धनुष्य हाती घ्यायचे आहे. २०१४ पेक्षा आणखी कडवे होऊन पुन्हा एकदा खासदार म्हणून विनायक राऊत यांना निवडून आणू असे, भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vinayak Raut fill form