बांगड्यासाठी मच्छीमार बंदीचे उल्लंघन

बांगड्यासाठी मच्छीमार बंदीचे उल्लंघन

रत्नागिरी - प्रजननासाठी किनाऱ्यावर येणारी बांगडा मासळी पकडण्यासाठी रत्नागिरीतील काही मच्छीमार बंदी मोडून समुद्रात झेपावत आहेत. त्यांना पकडण्यासाठी मत्स्य विभागाचे पथकही सतर्क झाले आहे. सकाळच्या सत्रात समुद्रात गेलेल्या नौका मिरकरवाडा बंदरात परतल्या; मात्र त्यातील एक नौका मत्स्य विभागाच्या जाळ्यात सापडली.

गुहागर येथील मच्छीमार असून त्यांच्याकडून सुमारे २८०० रुपयांची मासळी पथकाने ताब्यात घेतली. मिरकरवाडा येथे केलेली कारवाई मत्स्य परवाना अधिकारी रश्‍मी आंबुलकर, तुषार करगुटकर यांच्या पथकाने केली. पकडलेली नौका सुभाष भाग्या तांडेल यांची असल्याचे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून मच्छीमारी बंदीला आरंभ झाला. पहिल्याच दिवशी उल्लंघन करणाऱ्या सात नौकांवर मत्स्य विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. पाठोपाठ दुसऱ्या दिवशी तीन नौका पकडल्या.

सुमारे तीस ते चाळीस हजार रुपयांची मासळी मत्स्य विभागाने जप्त केली. त्यांच्यावर पाचपट दंडाची कारवाई व्हावी यासाठी तहसील विभागाकडे प्रस्तावही पाठविला आहे; मात्र बंदी लागू होऊन आठवडा पूर्ण झाला तरीही मच्छीमार अनधिकृतरीत्या मासेमारीसाठी समुद्रात धाव घेत आहेत.

रत्नागिरीपासून भाट्ये, मिऱ्या किनाऱ्यापासून काही अंतरावर यांत्रिकी नौका फिरताना दिसत आहेत. पावसाळा जवळ आला की प्रजननासाठी मासळी किनाऱ्यावर येते. सध्या किनाऱ्याजवळ बांगडी मासा मिळत आहे. तो पकडण्यासाठी काही नौका बंदी झुगारत आहेत. आतापर्यंत कारवाई केलेल्या नौकांमध्ये काही नंबर नसलेल्या नौकांचा समावेश आहे. मत्स्य विभागाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मच्छीमारांकडून शक्‍कल लढविली जात आहे. काही नौका रात्री मासेमारीसाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे मत्स्य विभागाकडून कारवाईसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

पाऊस नसला तरीही मच्छीमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मत्स्य विभागाकडून कारवाईसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
- आनंद पालव,
सहायक मत्स्य आयुक्‍त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com