विर्डी धरणासाठी आशेचा किरण

विर्डी - याच ठिकाणी प्रकल्प साकारत आहे. (छायाचित्र - प्रभाकर धुरी)
विर्डी - याच ठिकाणी प्रकल्प साकारत आहे. (छायाचित्र - प्रभाकर धुरी)

दोडामार्ग - गोवा शासन, म्हादई तंटा लवादा आणि अपुरा निधी अशा तिढ्यात सापडलेला विर्डी धरण प्रकल्प पुन्हा गती घेईल, अशी आशा निर्माण झाली आहे. दोन वर्षांहून अधिक काळ बंद असलेला हा प्रकल्प सुरू करण्याच्या दृष्टीने उद्या (ता. ४) मुंबईत होणाऱ्या गोवा आणि महाराष्ट्राच्या कंट्रोल बोर्ड बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असे सूतोवाच पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

विर्डी महाराष्ट्राचा लघुपाटबंधारे प्रकल्प आहे. तो वाळवंटी नदीवर प्रस्तावित आहे. साधारणपणे दहा वर्षांपूर्वी प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यावेळी याचा अंदाजित खर्च ४५ कोटी होता. 

प्रकल्पाची सुरवात तशी वेगळ्या अर्थाने गाजली. वाळवंटी नदीवर जेथे प्रकल्प प्रस्तावित होता ती जागा बदलण्यात आली. ठरलेल्या जागी प्रकल्प झाला असता तर अर्ध्याहून अधिक विर्डी गाव विस्थापित झाले असते.

त्यांच्या पुनर्वसनासाठी आणि नुकसानभरपाईसाठी मोठा खर्च आला असता. त्यातच गोव्याने विर्डी प्रकल्पाला पर्यावरणदृष्ट्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित करत विरोध केला. वाळवंटी नदीवर धरण झाल्यास गोव्याला जाणारे पाणी अडविले जाईल. त्यामुळे हा विरोध होता. प्रत्यक्षात महाराष्ट्राने या बाबींचा विचार करून प्रकल्प सह्याद्रीच्या पायथ्याशी नेला. शिवाय विर्डी प्रकल्पग्रस्त विस्थापित होण्याचा प्रश्‍नही सुटला. यात विर्डी सवईवाडीतील काही कुटुंबे मात्र विस्थापित होणार आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्‍न सुटण्याच्या मार्गावर आहे. एकूणच काही अडथळे पार करत प्रकल्पाचे काम मार्गी लागत होते. त्यातच कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या व गोव्याच्या पाणीप्रश्‍नावर म्हादई लवाद नेमला गेला. प्रकल्प या लवादच्या तिढ्यात सापडला.

या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लवादाने प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यास हिरवा कंदील दाखविला आहे. फक्त घळ भरणीचे काम करू नये, अशी सूचना केली आहे. असे असले तरी आर्थिक तरतूद नसल्याने प्रकल्प दोन वर्षे बंद अवस्थेत आहे. आर्थिक तरतुदीसाठी नवा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तो प्रशासकीय मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. काम सुरू करण्यासाठी निधी मिळावा यासाठी सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केली आहे. विर्डी परिसरातील तळेखोल, आयी, वझरे, आंबडगाव या गावांतील जमिनी पाण्याअभावी ओस पडल्या आहेत. प्रकल्प पूर्ण झाला तर हजारो हेक्‍टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. हजारो कुटुंबांची तहान भागणार आहे. परिसरातील पाण्याचे दुर्भिक्ष संपणार आहे. पावसाळा संपताच कोरडे पडणारे नाले, ओहोळ, दुथडी भरून वाहणार आहेत. त्यासाठी उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णयाची आवश्‍यकता आहे.

आजचा दिवस विर्डीसाठी निर्णायक
वेगवेगळ्या कारणांमुळे रखडलेला विर्डी प्रकल्प सध्या आर्थिक अडचणींमुळे गतिहीन झाला आहे. प्रकल्प खर्चाच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली तर १५ जानेवारीनंतर काम सुरू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी उद्याची कंट्रोल बोर्डाची बैठक निर्णायक ठरणार आहे.

कामांसाठी लवादाचा हिरवा कंदील
सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून येणारे पाणी अडविण्यास गोवा शासनाचा विरोध आहे. लवादाकडून त्याबाबत अंतिम निकाल झालेला नाही. तथापि निकाल लागेपर्यंत प्रकल्पाची अन्य कामे करण्यास लवादाचा विरोध नाही. फक्त घळभरणी करता येणार नाही, अशी स्पष्ट सूचना देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com