मालवणात नवीन मतदार यादीबाहेरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 सप्टेंबर 2016

मालवण- येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 304 मतदार निश्‍चित केले आहेत. प्रभाग रचनेसाठी मतदार निश्‍चितीही करण्यात आली आहे. या मतदार यादीत पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी आणि विद्यमान नगरसेवकांनी नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीवर अखेर पाणी पडले आहे. राज्य निवडणूक आयोगाने नवीन मतदारांची नावे पालिका निवडणूकीसाठी समाविष्ट केली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

मालवण- येथील पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 304 मतदार निश्‍चित केले आहेत. प्रभाग रचनेसाठी मतदार निश्‍चितीही करण्यात आली आहे. या मतदार यादीत पालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांनी आणि विद्यमान नगरसेवकांनी नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी घेतलेल्या मेहनतीवर अखेर पाणी पडले आहे. राज्य निवडणूक आयोगाने नवीन मतदारांची नावे पालिका निवडणूकीसाठी समाविष्ट केली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

1 जानेवारी 2016 या दिनांकावर निश्‍चित झालेली मतदार यादी आणि त्यानंतर 10 सप्टेंबर 2016 पर्यत नावे समाविष्ट होऊन निश्‍चित झालेली पुरवणी मतदार यादी पालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेली आहे. तशा प्रकारच्या सूचना आणि मतदार यादी प्रशासनाकडे पाठविली आहे. या मतदार याद्यांमध्ये नवीन मतदारांच्या नावांचा उल्लेख दिसून न आल्याने अनेकांचे डोळेच पांढरे पडले. याबाबत अनेकांनी तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेशी संपर्क साधून याची माहिती घेण्यास सुरवात केली.

शहरासाठी आठ प्रभागात निवडणूक होणार आहे. आठ प्रभागातून सतरा नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. पहिल्या सात प्रभागातून प्रत्येकी दोन आणि आठव्या प्रभागातून तीन नगरसेवक निवडण्यात येणार आहेत. शहरासाठी 14 हजार 304 मतदार निश्‍चित झालेले असून हे मतदार आपला नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडणार आहेत. नगराध्यक्षपदाचे आरक्षण अद्याप निश्‍चित झालेले नसल्याने शासन निर्णयाच्या प्रतिक्षेत अनेक इच्छुक आहेत. मात्र निवडणूक आयोगाने इच्छुकांनी मोठ्या संख्येने नवीन मतदार समाविष्ट करण्यासाठी घेतलेली मेहनत वाया गेली आहे. परिणामी अनेकजण नाराज झाले असून त्यांनी काहींनी याला हरकत घेण्याची तयारी सुरू केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाळ प्रांत यांनी पालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी विभाजन केले. 26 सप्टेंबरला मतदार यादी प्रभागनिहाय प्रसिद्ध केली आहे. या यादीवर हरकती व सूचना देण्यासाठी 7 ऑक्‍टोबरपर्यत मुदत देण्यात आली आहे. हरकतींमध्ये लेखनिकांच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, संबंधित प्रभागाच्या क्षेत्रातील विधानसभा मतदार यादीतील मतदारांची नावे असूनही प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नावे चुकून वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे याबाबत विचार करून सुधारणा व दुरूस्त्या करण्यात येणार आहेत.

निवडणूक आयोगाकडून युवा मतदारांना मतदानासाठी आकर्षिक असे अनेक उपक्रम राबविले जातात. पालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर अनेक युवा मतदारांनी आपली नाव नोंदणी निवडणूक विभागात केली होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार याद्यांमध्ये नवीन मतदारांचा समावेश नसल्याचे दिसून आल्याने युवा मतदार या वेळी मतदानापासून वंचित राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे अनेक राजकीय पक्षांकडून राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले जाणार आहे.

प्रभागनिहाय मतदार
प्रभागनिहाय निश्‍चित केलेले मतदार असे- प्रभाग एक- 1660, प्रभाग दोन- 1710, प्रभाग तीन- 1622, प्रभाग चार- 1601, प्रभाग पाच- 1626, प्रभाग सहा- 1757, प्रभाग सात- 1840, प्रभाग आठ- 2488 यात प्रभाग क्रमांक चार हा सर्वात कमी मतदार असलेला प्रभाग ठरला आहे.

Web Title: voter name not availabe in list