सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी शिवसेना, भाजपसमोर कशाची डोकेदुखी ? 

Voters Dividation Headaches For Shiv Sena, BJP For Sawantwadi city president
Voters Dividation Headaches For Shiv Sena, BJP For Sawantwadi city president

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - नगराध्यक्ष पोटनिवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी अपेक्षित असतानाच दोन्ही पक्षांसमोर मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे. आघाडीतील संभाव्य बिघाडी, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारी हे या दोन्ही मुख्य स्पर्धकांच्या डोकेदुखीचे कारण बनले आहे. 

येथील नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसाठी सात जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. यात शिवसेनेचे खेमराज ऊर्फ बाबू कुडतरकर, कॉंग्रेसचे दिलीप नार्वेकर, भाजपचे संजू परब यांसह अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेले माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, जावेद शेख, अमोल साटेलकर यांचा समावेश आहे. माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ही निवडणूक शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे स्पष्ट केले होते; मात्र प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरताना तिन्ही पक्षांकडून अर्ज दाखल केल्याने आघाडीत बिघाडी असल्याचे चित्र आहे.

कुडतरकर की नार्वेकर

श्री केसरकर यांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आघाडीचा उमेदवार ठरेल, असे संकेत दिले आहेत. शिवसेनेच्या कुडतरकर यांना उमेदवारी निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. असे झाल्यास माजी नगराध्यक्ष असलेले ऍड. नार्वेकर माघार घेणार की लढणार हा प्रश्‍न आहे. त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्यास शिवसेनेला मतविभागणीचा फटका बसू शकतो. आघाडीतील राष्ट्रवादीचे बबन साळगावकर यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. साळगावकर हे माजी नगराध्यक्ष असून, त्यांना मानणारा मतदार आहे. त्यांनी दावेदारी कायम ठेवली तर शिवसेनेचेच नुकसान होऊ शकते. हे दोन्ही उमेदवार दिग्गज असल्याने शिवसेनेसमोरील डोकेदुखी वाढली आहे. 

कोरगावकरांचे आव्हान

भाजपची स्थितीही फारशी वेगळी नाही. प्रभारी नगराध्यक्षा असलेल्या कोरगावकर यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत पक्षासमोर आव्हान उभे केले आहे. कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे. याचा फटका भाजपच्या अधिकृत उमेदवाराला बसू शकतो. एकूणच भाजप व महाविकास आघाडीत बंडखोरी होण्याची शक्‍यता असल्याने बंडोबांना शमविणे दोघांना कठीण होणार आहे. 

बुधवारी ठरणार खरे दावेदार 

बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न सध्या छुप्या पद्धतीने सुरू आहेत. आपल्याला फटका बसू शकेल, अशा उमेदवारांना अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी वरिष्ठांनी कंबर कसली आहे. अर्थात बुधवारी (ता.18) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com