प्रवाशांना समजणार आता एसटी ठावठिकाणा; गाड्यात व्हीटीएस यंत्रणा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

रत्नागिरी - एसटी आगारात किंवा स्थानकात वाट पाहत तिष्ठत उभ्या राहिलेल्या प्रवाशांना आता आपल्या गाडीचा ठावठिकाणा बसल्या जागी समजणार आहे. चिपळूण आणि रत्नागिरी आगारातील १२५ गाड्यांमध्ये व्हीटीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत ही यंत्रणा सुरू होऊन प्रवाशांना एसटीचा ठावठिकाणा समजणार आहे.

एसटी महामंडळ गेल्या दोन वर्षापासून व्हीटीएस यंत्रणेवर काम करत आहे. एसटी स्थानकात किंवा आगारात उशिरा येण्यामागे अनेक कारणे असतात. त्याचा परिणाम अन्य बस सेवांवर होतो. एसटीचे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांनाही बसची सद्यस्थिती समजण्यास मदत मिळावी, हे व्हीटीएस अंमलबजावणीमागील उद्देश आहेत. एखाद्या नियोजित किंवा अधिकृत थांब्यावरही बस न थांबल्यास त्याची माहितीही यामुळे महामंडळाला समजेल व त्या बस चालक किंवा वाहकावर कारवाईही करता येणे शक्‍य होणार आहे.

महामंडळाने १८ हजार बसगाड्यांपैकी नाशिक विभागासह अन्य काही मार्गावरील चार हजार बसगाड्यांना व्हीटीएस यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर बसवली. प्रवाशांसाठी सुविधा अमलात आणण्याऐवजी सुरुवातीला महामंडळाकडून त्याचा आढावा घेण्यात येत होता. आता प्रत्यक्षात प्रवाशांसाठीदेखील ऑगस्ट महिन्यात सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील दोन आगारातील एसटी गाड्यांवर व्हीटीएस ही यंत्रणा बसवण्यात आली असून, लवकरच ती कार्यान्वित होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VTS system in Ratnagiri and Chiplun ST Buses