प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा

प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा

मुंबई-गोवा महामार्ग - रत्नागिरीत भरपाई वितरण सुरू

कणकवली - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील प्रकल्पग्रस्तांना मोबदल्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. भू-संपादनातील सर्व प्रक्रिया सहा महिन्यांपूर्वीच पूर्ण झाल्या. तसेच सिंधुदुर्गातील ३५ गावांसाठी ७३४ कोटी ८२ लाखांचा निवाडाही जाहीर झाला. प्रत्यक्षात १६९ कोटी एवढीच रक्‍कम भू-संपादन विभागाकडे जमा झाली आहे. 

जोपर्यंत पूर्ण रक्‍कम येत नाही, तोपर्यंत मोबदला वितरण होत नाही आणि मोबदला मिळाल्याखेरीज चौपदरीकरणाचे काम सुरू होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. दरम्यान, इंदापूर ते झाराप या टप्प्याचे काम केंद्र सरकारने १९ कंपन्यांकडे सोपविले आहे. त्यासाठीची टेंडर प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

महामार्ग चौपदरीकरणात रत्नागिरी विभागाने आघाडी घेतली आहे. तेथील प्रकल्पग्रस्तांना संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदला वाटपाचे काम सुरू झाले आहे. तेथील जमिनीचा भू-संपादन वेळेस असलेला रेडीरेकनर दर आहे, त्याप्रमाणे जमिनीचा दर निश्‍चित करून जो मोबदला येतो, त्याची दुप्पट अधिक त्या जमिनीतील असणारी इतर मालमत्ता या सगळ्यांची किंमत मिळविण्यात आली आहे. याखेरीज थ्रीडी अधिसूचना जाहीर झाल्याच्या तारखेपासून एकूण मोबदल्यावर १२ टक्‍के व्याज रक्‍कम अधिक करून भूमिपुत्रांना मोबदला दिला जात आहे. 

याच धर्तीवर सिंधुदुर्गातही मोबदला वितरणाची कार्यवाही होणार आहे; मात्र अद्यापही ५६५ कोटींची मोबदला रक्‍कम येणे बाकी आहे. ही रक्‍कम भू-संपादन विभागाकडे प्राप्त होताच, संबंधित खातेदारांना त्या रकमेचे वितरण सुरू होणार असल्याची माहिती भू-संपादन विभागाकडून देण्यात आली. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ५ हजार कोटींची तरतूद केली, तर महामार्ग पूर्णत्वासाठी अजून १० हजार कोटींची आवश्‍यकता आहे. यातील ४० टक्‍के हिस्सा केंद्र शासनाकडून दिला जाणार आहे. उर्वरित ६० टक्‍के खर्च ठेकेदार करणार आहेत. हा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल केला जाणार आहे. 

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील पनवेल ते इंदापूरपर्यंतच्या ८४ किलोमीटरचे काम पाच वर्षांपासून सुरू आहे. यात २८ किमी.चे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम डिसेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६६.१७० किलोमीटरचे काम चार टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. पहिला टप्पा इंदापूर ते कशेडी ८४ ते १६१ किमी, दुसरा टप्पा कशेडी पायथा ते संगमेश्‍वर ओझरखोल १६१ ते २६५ किमी असा टप्पा आहे. तिसरा टप्पा ओझरखोल ते राजापूर २६५ ते ३५१ किमी अंतराचा, तर चौथा टप्पा राजापूर ते झाराप ३५१ ते ४५० किमी या अंतराचा आहे. या कामासाठीची जबाबदारी १९ कंपन्यांकडे देण्यात आली आहे. या कंपन्यांनी त्या अनुषंगाने सर्वेक्षणदेखील पूर्ण केले आहे. मोबदला वितरणानंतर जमीन महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्यानंतर लगेचच कामाला सुरवात होणार आहे.
 

महामार्गाचे सर्वेक्षण करून कामाची निश्‍चिती
सिंधुदुर्गात खारेपाटण ते कलमठ या टप्प्याच्या चौपदरीकरणासाठी के. सी. बिल्डकॉन (हरियाना) आणि कलमठ ते झाराप या टप्प्यासाठी दिलीप बिल्डकॉन (भोपाळ) या एजन्सीकडे काम सोपविण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्यांनी गेल्या महिन्यात महामार्गाचे सर्वेक्षण करून कामाची निश्‍चिती केली आहे. महामार्ग विभागाकडे जमीन हस्तांतरित होताच या कंपनीकडून चौपदरीकरणाचे काम सुरू केले जाणार आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com