वारणा बॅंकेचे पन्नाशीतही खणखणीत नाणं!

वारणा बॅंकेचे पन्नाशीतही खणखणीत नाणं!

शेतकरी व सामान्याचे हाल थांबवण्यासाठी ग्रामीण माणूस डोळ्यापुढे ठेवून कै. तात्यासाहेब कोरे यांनी वारणा बॅंक सुरू केली. आज पन्नास वर्षांनंतरही शेतकरी, सर्वसामान्यांचे आयुष्य सुखकर करताना बॅंकेचे नाणे अगदी खणखणीत वाजत आहे.

‘आपल्या आकांक्षांच्या क्षितिजाला ‘अर्थ’ देणारी बॅंक’ हे ब्रीद वाक्‍य घेऊन पन्नाशीतही खणखणीत नाणं असलेली बॅंक म्हणजे वारणा बॅंक. सहकार व त्याच्या नीतिमूल्यांची मोठ्या प्रेमाने आणि विश्‍वासाने जपणूक करत २८ फेब्रुवारी १९६६ रोजी सहकारमहर्षी कै. तात्यासाहेब कोरे यांनी वारणा बॅंकेचे रोपटे लावले. पन्नास वर्षांत रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात झाले असून केवळ कोल्हापूर जिल्हाच नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत सुरू केलेल्या शाखांच्या माध्यमातून या बॅंकेने आपले ब्रीद वाक्‍य खरे दाखवले आहे. 

त्या काळात शेतकरी असो किंवा सामान्य लोक, बॅंकेपेक्षा सावकारांच्या दारात जायचे. सावकारांकडून होणारी त्यांची पिळवणूक, जमीन हडप करण्याचे प्रकार यांमुळे शेतकरी कंगाल व्हायचा. शेतकरी व सामान्याचे हाल थांबवण्यासाठी त्या काळात बॅंकांची गरज होती. ही गरज ओळखून ग्रामीण माणूस डोळ्यापुढे ठेवून कै. तात्यासाहेब कोरे यांनी ही बॅंक सुरू केली. निर्धार पक्का असेल आणि दिशा निश्‍चित असेल तर कोणतेही खडतर आव्हान लीलया पेलता येते हा विश्‍वास कै. कोरे यांच्यासह त्यांचे नातू व बॅंकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी या बॅंकेच्या माध्यमातून सार्थ करून दाखवला आहे. अतिउच्च तंत्रज्ञान, दर्जात्मक, परिपूर्ण व सर्वंकष तांत्रिक सेवा या जोरावर बॅंकेचा हा डोलारा ३५ शाखांच्या माध्यमातून अविरत उभा आहे. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या लोकांना बळ देणे, सामाजिक स्वास्थ्य सुधारणे हा सहकाराचा मुख्य हेतू आहे. याच हेतूने प्रेरित होऊन पारदर्शक व सभासद हिताचा कारभार केल्याने पन्नास वर्षात बॅंकेला कोणतेही गालबोट लागलेले नाही. आज बॅंकेकडे असलेल्या ६८२ कोटीच्या ठेवी हे बॅंकेच्या चांगल्या कारभाराची साक्ष देत आहेत. कोल्हापूरसह नवी मुंबई, पुणे, पनवेल, अमरावती, नगर, इस्लामपूर, कऱ्हाड, सातारा आदी ठिकाणी असलेल्या बॅंकेच्या ३५ शाखांच्या माध्यमातून विविध कर्ज योजना, ठेव योजनांच्या माध्यमातून बॅंकेने आपला लौकिक ५० वर्षांनंतरही कायम ठेवला आहे.

एखादी संस्था सलग ५० वर्षे त्याच क्षेत्रात काम करत असताना त्या संस्थेने आपली गौरवशाली परंपरा कायम राखल्याची अनेक उदाहरणे असतील; पण त्यातही वारणा बॅंकेचे स्थान अग्रस्थानी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com