ओल्या कचऱ्यावर बायोगॅस प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

रत्नागिरी - येथील पालिकेने ओल्या कचऱ्यावर आधारित ५ टनाचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्‍चित केली आहे. पालिकेच्या मालकीची मिरकरवाडा भागातील लघुउद्योग वसाहतीमधील ही जागा आहे. डिसेंबर अखेरीस हा प्रकल्प उभारण्यात येईल. वीजनिर्मितीऐवजी गॅसनिर्मिती करून तो सिलिंडरमध्ये भरून देण्याचा प्रयोग केला जाणार आहे. 

रत्नागिरी - येथील पालिकेने ओल्या कचऱ्यावर आधारित ५ टनाचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी जागा निश्‍चित केली आहे. पालिकेच्या मालकीची मिरकरवाडा भागातील लघुउद्योग वसाहतीमधील ही जागा आहे. डिसेंबर अखेरीस हा प्रकल्प उभारण्यात येईल. वीजनिर्मितीऐवजी गॅसनिर्मिती करून तो सिलिंडरमध्ये भरून देण्याचा प्रयोग केला जाणार आहे. 

शहराच्या कचऱ्याचा प्रश्‍न गेली अनेक वर्षे सुटला नव्हता. दांडेआडोम येथील जागेचा विषय न्यायप्रविष्ट आहे. त्यात गावकऱ्यांच्या बाजूने निकाल लागल्याने पालिकेनेही पुढे जाण्यात रस दाखविलेला नाही. एवढ्या लांब कचरा वाहतुकीलादेखील ते पालिकेला परवडणारे नाही. यापूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनीदेखील बायोगॅस प्रकल्पाबाबत आश्‍वासने दिली होती. परंतु ते शक्‍य झाले नाही. मात्र शिवसेनेने निवडणुकीदरम्यान आपल्या वचननाम्यातच घनकचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन दिले होते.

त्यानुसार नगराध्यक्ष राहुल पंडित, मुख्याधिकारी श्री. माळी आदींनी वेंगुर्ला आणि गोवा येथील घनकचरा प्रकल्पांचा अभ्यास दौरा केला. या अभ्यास दौऱ्यामध्ये अनेक पर्याय पालिकेसमोर आले. 

नगराध्यक्षांनी यामध्ये पुढाकार घेऊन प्रकल्पाच्या जागेसाठी भांडण्याऐवजी पालिकेची हक्काची जागा शोधली. मिरकरवाडा येथे लघुउद्योगासाठी पालिकेची मोठी जागा आहे. त्यामध्येच ५ टनांचा हा बायोगॅस प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित केले आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू झाली आहे. शहरातून दररोज सुमारे २२ टन घनकचरा निघतो. त्यापैकी ८ ते १० टन ओला कचरा असतो. या ओल्या कचऱ्यावर आधारित हा ५ टनांचा बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेकडे सुमारे सव्वा कोटीच्या वर निधी उपलब्ध आहे. डिसेंबरअखेर हा प्रकल्प पूर्ण करण्याचा दावा नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी केला आहे.

घनकचऱ्याच्या जागेचा प्रश्‍न सुटला आहे. मिरकरवाडा येथील लघुउद्योग वसाहतीची जागा निश्‍चित केली आहे. डिसेंबरअखेर ओल्या कचऱ्यावर आधारित हा बायोगॅस प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस आहे. 

- राहुल पंडित, नगराध्यक्ष, रत्नागिरी पालिका

Web Title: Waste of wet biogas project