वाढत्या उष्म्याने पाण्याचे वेगाने बाष्पीभवन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

रत्नागिरी - दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्म्याचा परिणाम धरणसाठ्यांवर होण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. यावर्षी समाधानकारक पावसामुळे धरणे भरली; पण सरासरी तापमान वाढल्याने बाष्पीभवन प्रक्रिया वेगाने होणार आहे. जमिनीत पाणी मुरण्याची क्रिया वाढून मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईला निमंत्रण मिळणार आहे. 

रत्नागिरी - दिवसेंदिवस वाढत असलेल्या उष्म्याचा परिणाम धरणसाठ्यांवर होण्याची दाट शक्‍यता वर्तविली जात आहे. यावर्षी समाधानकारक पावसामुळे धरणे भरली; पण सरासरी तापमान वाढल्याने बाष्पीभवन प्रक्रिया वेगाने होणार आहे. जमिनीत पाणी मुरण्याची क्रिया वाढून मे महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईला निमंत्रण मिळणार आहे. 

रत्नागिरी एमआयडीसीची पाच धरणे आहेत. त्यात हरचिरी, आंजणारी, असोंड, निवसर, घाटिवळे यांचा समावेश आहे. पाऊस चांगला झाल्याने धरणांमध्ये पुरेसे पाणी आहे. गेल्या आठ दिवसांत उकाड्यात वाढ झाल्याने तापमान वाढले आहे. त्यामुळे धरणातील पाणी कमी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी तापमान मार्चच्या पहिल्या आठवड्यानंतर जाणवते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यातच चटके बसत आहेत. वाढत्या उष्म्यामुळे धरणात साठलेल्या पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होते. धरणातील पाण्याचा उपयोग रत्नागिरी शहर व परिसरातील दहा गावांमध्ये केला जातो. गेली दोन वर्षे मे महिन्याच्या अखेरीस धरण सुकल्याने टंचाईला सामोरे जावे लागले. 2015 मध्ये 15 मे नंतर पाण्याची टंचाई जाणवली होती. पाणी कपात करण्यात आली होती. खासगी टॅंकरशिवाय पर्याय नव्हता. तीच परिस्थिती गेल्यावर्षीही उद्‌भवली होती. 

यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने सध्या सर्व धरणात 60 टक्‍क्‍यांहून अधिक पाणी आहे; परंतु उष्म्याचा वाढता वेग पाहता यावर्षीही टंचाई जाणवण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. गेली आठ दिवस 36 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत पारा स्थिर आहे. बाष्पीभवनाची प्रक्रिया वेगाने होत असल्याने हा साठा कमी होण्याची शक्‍यता आहे. धरणातून रत्नागिरी एमआयडीसीसह दहा गावांना दररोज 9 एमएलडी पाणी पुरवले जाते. 

दुरुस्तीअभावी असोंड धरण कोरडेच 
असोंड (ता. लांजा) येथील धरणाची दुरुस्ती झालेली नसल्याने पाणी साठलेले नाही. ब्रीज, गेट याची तत्काळ दुरुस्ती केली जाणार आहे. त्यासाठी 70 ते 80 लाख रुपये निधी आवश्‍यक आहे. शासनाकडून 39 लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्या कामाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. त्यातून काम पूर्ण होणार नाही. 

Web Title: water evaporation