नळपाणी योजनांच्या कर्मचाऱ्यांना पाडवा भेट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

रत्नागिरी - जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या नांदिवसे (चिपळूण) प्रादेशिक नळपाणी योजनेवरील नऊ कामगारांचा प्रश्‍न नूतन अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी क्षणभरात सोडवत झटपट काम करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी दाखवून दिले. गेले वर्षभर ते कामगार पगाराच्या प्रतीक्षेत होते. त्यांना दिलासा मिळाला आहे. 

रत्नागिरी - जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या नांदिवसे (चिपळूण) प्रादेशिक नळपाणी योजनेवरील नऊ कामगारांचा प्रश्‍न नूतन अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी क्षणभरात सोडवत झटपट काम करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी दाखवून दिले. गेले वर्षभर ते कामगार पगाराच्या प्रतीक्षेत होते. त्यांना दिलासा मिळाला आहे. 

सौ. सावंत यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारून काहीच दिवस झाले आहेत. पदभार घेतल्यानंतर शिरगाव मतदारसंघातील कोसळलेल्या कासारवेली शाळेला भेट देऊन तेथील प्रश्‍न मार्गी लावला होता. मिऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून कारभार चालविणाऱ्या सौ. सावंत यांनी जिल्हापरिषदेचा कारभारही तेवढ्याच हिमतीने चालवण्याचा निर्धार केला आहे. नांदिवसे प्रादेशिक नळपाणी योजनेच्या कामगारांना गेले वर्षभर पगारच मिळालेला नाही, तरीही ते कामावर येत आहेत. त्यांच्या पगारासंदर्भात न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्याचा निकाल अद्यापही लागलेला नाही. ते कर्मचारी काम करीत असल्याने त्याचा मोबदला त्यांना मिळणे आवश्‍यक आहे. नांदिवसे पंचायत समिती सदस्य प्रताप शिंदे यांच्यासह तेथील सरपंच, ग्रामस्थ आणि कामगारांनी आज अध्यक्षा सौ. सावंत यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे हा प्रश्‍न मांडला. सौ. सावंत यांनी तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आणि कार्यकारी अभियंता श्री. थोरात यांना बोलावून घेतले. 

पगारापासून वंचित राहिलेल्या त्या कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने करा, अशा सूचना दिल्या. न्यायालयात प्रकरण सुरू असले तरीही ते कामगार काम करत आहेत. केलेल्या कामाचा मोबदला त्यांना मिळालाच पाहिजे. त्यासाठी कायदेशीर बाबी तपासून लगेचच कार्यवाही करावी, असे सौ. सावंत यांनी सांगितले. त्यानुसार श्री. मिश्रा यांनीही पाणीपुरवठा विभागाकडून ती फाईल मागवली व लवकरात लवकर त्या कामगारांना पगार देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. 

पिंपळी उपकेंद्राला निधी द्या 
चिपळूण-कराड हायवेवरील पिंपळी गावात प्राथमिक उपकेंद्र मंजूर व्हावे, यासाठी संबंधित सरपंच आणि ग्रामस्थ गेली 6 महिने पाठपुरावा करत होते. हा निधी मंजूर करून देण्याच्या सूचना स्नेहा सावंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. आठल्ये यांना दिल्या आहेत.  

Web Title: Water pipeline schemes for employees New Year gift