खोपोली नगरपालिका क्षेत्रातील वाड्यासह वस्तीभागांत पाणी समस्या

अनिल पाटील
मंगळवार, 26 मार्च 2019

बहुतेक सर्व आदिवासी वाड्यामधील नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता येथील नागरिकांनी नियमानुसार नळ जोडणी करून घेण्याची गरज आहे. नगरपालिकेकडून तसे आवाहन करण्यात येत आहे. नळ जोडणी झाल्यावर मुबलक पाणी उपलब्ध होईल.

- राजू गायकवाड, पाणीपुरवठा सभापती ,खोपोली

खोपोली (जिल्हा रायगड) : खोपोलीची ओळख भविष्यातील महामुंबईतील प्रमुख शहर असा केला जात आहे.  खोपोलीची दुसरी ओळख महाराष्ट्रातील श्रीमंत नगरपालिका अशी ही आहे . मात्र, ही श्रीमंती फक्त उच्च व अतिश्रीमंत रहिवासी संकुले; व्यापारी वसाहती, उद्योग व मुख्य शहरी भागातच पाहायला मिळत असून, खोपोली नगरपालिका क्षेत्रातील सारसन आदिवासी वाडी, मिल ठाकूरवाडी, जांभळाची वाडी, नारायण ठाकूरवाडी, बोरीवली धनगर वाडा/ठाकूरवाडी आदी आदिवासी पाड्यांत उन्हाळी हंगामात पिण्याच्या पाण्यासाठी आदिवासी महिला टाहो फोडत आहेत.

अनेक ठिकाणी नगरपालिकाकडून नवीन पाईप जलवाहिनी टाकली गेली. परंतु नळ जोडणी झाली नसल्याने येथील नागरिकांना पाणी उपलब्ध होत नाही. नगरपालिकेचा पाणी टँकर तरी, येणार म्हणून येथील महिला रोजगार बुडवून पाणी भरण्यासाठी घरीच थांबत आहेत. तर पुरुष मंडळीही त्यांना मदत करण्यासाठी पाण्याच्या टँकरची चातकाप्रमाणे वाट पाहत असतानांचे चित्र आहे. येथे दुरून नगरपालिकेचा टँकर दिसल्यास बच्चेकंपनी दिवाळीची  फटाकेबाजी व्हावी. त्याप्रमाणे आनंदाने नाचत जल्लोष करतात, असे चित्र दिसत आहे.  

पिण्याच्या पाण्यासाठी अख्या वाड्यातील वयोवृद्ध, गरोदर महिला तसेच शाळकरी लहान मुले  पाणी भरण्यासाठी स्वतःला झोकून देत आहेत. लोकप्रतिनिधीही  याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. दुसरीकडे बोरघाटात असणाऱ्या धनगर व ठाकूर समाजाच्या रहिवाशांनाही पाणी दुर्मिळ झाले आहे. खोपोली नगरपालिकेच्या वाढीव पाणीपुरवठा नियोजनाचा फायदा या आदिवासी वाड्यांना अद्याप न मिळाल्याने त्यांची पाण्यासाठी पायपीट अजून थांबली नाही.

पावसाळ्यात नगरपालिकेचा टँकरपर्यंत पोहचत नसल्याने 350 लोकसंख्या असणाऱ्या या पाड्यांना पावसाळ्यात वाहत्या ओहाळाचे किंवा डवऱ्यातील पाणी प्यावे लागत आहे. आमचे नशीब कधी खुलणार श्रीमंत पालिकेचा हिस्सा म्हणून आम्हाला पाणी तरी मिळेल का अशी विचारणा येथील वयोवृद्ध व आदिवासी महिला पुरुष करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water problems in Khopoli Municipality Area