लोकसहभागातून रस्ताही झाला पाणीदार...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

देवरूख - लोकसहभागातून काम सुरू झाले की ते यशस्वी होतेच. उजगाव-कानसरेवाडीतील रस्ता ग्रामस्थांनी दुरुस्त केला. त्याचवेळी तेथे झरे सापडले. त्यामुळे रस्त्यासोबत पाण्याचा प्रश्‍नही सुटला. संगमेश्‍वर तालुक्‍यातील उजगावातील एकीतून श्रमदान आणि लोकवर्गणीच्या साह्याने प्रश्‍न सोडविण्यास सुरवात केली व शासनाच्याच डोळ्यांत अंजन घातले.

देवरूख - लोकसहभागातून काम सुरू झाले की ते यशस्वी होतेच. उजगाव-कानसरेवाडीतील रस्ता ग्रामस्थांनी दुरुस्त केला. त्याचवेळी तेथे झरे सापडले. त्यामुळे रस्त्यासोबत पाण्याचा प्रश्‍नही सुटला. संगमेश्‍वर तालुक्‍यातील उजगावातील एकीतून श्रमदान आणि लोकवर्गणीच्या साह्याने प्रश्‍न सोडविण्यास सुरवात केली व शासनाच्याच डोळ्यांत अंजन घातले.

गावातील कानसरेवाडीत १९९५ ला सुरू झालेल्या योजनेचे पाइप खराब झाले. टाकीची दुरवस्था झाल्याने योजना बंद पडली. शेकडो ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरू होती. येथील रस्ताही पूर्णतः खराब होता; मात्र येथील ३५० ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्‍न स्वतःहून सोडविला आहे. श्रमदानातून रस्त्याचे काम करत असताना ग्रामस्थांना पाण्याचे झरे सापडले. येथेच विहीर खोदण्यात आली. यासाठी लोकवर्गणी कामी आली. सध्या येथे ७ फूट पाणी आहे. यामुळे रस्त्याचे कामही झाले आणि पाण्याचा प्रश्‍नही सुटला आहे. रस्ता करताना हाती आलेले दगड आणि मातीचा उपयोग गावात वनराई बंधारा बांधण्यासाठी करण्यात आला.

यामुळे विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली. याशिवाय गावातील दोन गणेशविसर्जन घाटांचे मजबुतीकरणही ग्रामस्थांनीच केले. यावर्षी केवळ ही कामे झाली असली तरी ती महत्त्वाची कामे होती. यामुळे पुढील वर्षी पुन्हा एकत्र येऊन गावातील अन्य कामे मार्गी लावण्याचा ध्यास येथील ग्रामस्थांनी घेतला आहे.

देवरूखपासून १८ किमी अंतरावर वसलेल्या उजगावमध्ये शेवरवाडी, ब्राह्मणवाडी, बौद्धवाडी, बडदवाडी, गुरववाडी, सुमारवाडी, तेलेवाडी, कानसरेवाडी, नवेलेवाडी, भोवरीचीवाडी, पिंगळेवाडी आणि गवळवाडी अशा वाड्या मिळून एकूण २२०० लोकसंख्या आहे. येथील विविध समस्या प्रलंबित आहेत. वाडीवस्तीवरील रस्ते उखडलेले आहेत. आरोग्य सुविधा, दळणवळण, संपर्कप्रश्‍न याचप्रमाणे पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव असलेल्या या गावातील लोकांनी शासनाकडे या समस्या सोडवण्यासाठी मदतीची मागणी केली होती. ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून संपूर्ण गावचा विकास होणे शक्‍य नाही. त्यामुळे गावकऱ्यांनी पुढाकार घेतला.

Web Title: water receive on road