सुधागडने दाखवले पाणी!

सुधागडने दाखवले पाणी!

पाली - सुधागड हा डोंगर व दऱ्यांनी वेढलेला आणि आदिवासीबहुल तालुका आहे. काही वर्षांपूर्वी येथील अनेक गावे व आदिवासी वाड्या-पाड्यांवर मार्च-एप्रिलपासूनच पाणीटंचाईची भीषण समस्या भेडसावत असे; मात्र जलयुक्त शिवार व राष्ट्रीय पेयजल योजनेतून झालेली भरीव कामे, टंचाई कृती आराखड्यातील कामे आणि लोकसहभागातून सुधागड तालुक्‍यातील पाणीटंचाईचे चित्र जवळपास पुसले गेले आहे. काही तुरळक गावे व वाड्या वगळता तालुक्‍यात पाणीटंचाई शिल्लक नाही. त्यामुळे माणसांबरोबर प्राणिमात्रही सुखावले आहेत. 

जलयुक्त शिवारने आणली बहार
जलयुक्त शिवाराची कामे कृषी विभाग, जिल्हा परिषदेचा पाटबंधारे विभाग व वन विभागाकडून केली जातात. सुधागड तालुक्‍यात मागील दोन वर्षांतील ही कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षीची कामेही जोरात सुरू आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणचे जलस्रोत व भूजलसाठे वाढले आहेत. २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अंतर्गत चंदरगाव, उद्धर व अडुळसे या गावांचा समावेश होता. या ठिकाणी सिमेंट व माती बंधारे बांधण्यात आले. शेततळी तसेच सलग समतल चर खोदण्यात आले. ही गावे आता जलपरिपूर्ण झाली आहेत. २०१६-१७ मध्ये जलयुक्त शिवार योजनेत कळंब आणि कळंबोशी या गावांचा समावेश होता. तेथही सिमेंट व माती बंधारे बांधण्यात आले. समतल चर खोदण्यात आले व जुनी भातशेती दुरुस्ती करण्यात आली. ही दोन्ही गावे आता जलपरिपूर्ण झाली आहेत. २०१७-१८ या वर्षात जलयुक्त शिवारमध्ये १६ गावांचा समावेश केला आहे. ‘ग्राम सामाजिक परिवर्तन’अंतर्गत येणाऱ्या गावांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. कृषी विभागामार्फत करण्यात येणाऱ्या कामामध्ये सिमेंट व माती बंधारे बांधणे, समतल चर खोदणे व जुनी भातशेती दुरुस्त करणे या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी कृषी विभागाकडे दोन कोटी ३२ लाख रुपयांचे बजेट आहे. सध्या यातील ३० ते ३५ टक्के कामे पूर्ण झाली असून जूनपर्यंत ७० ते ८० टक्के कामे पूर्णत्वास जातील, असे तालुका कृषी अधिकारी अनिल रोकडे यांनी ‘सकाळ’ला सांगितले. ‘जलयुक्त शिवार’च्या या वर्षीच्या कामांसाठी जिल्हा परिषद पाटबंधारे विभागाकडे अंदाजे तीन कोटी ८७ लाख; तर वन विभागाकडे अंदाजे ३५ लाखांचा निधी आहे. त्यामुळे या वर्षीही १६ गावे जलसमृद्ध होतील.

‘राष्ट्रीय पेयजल’च्या तीन वर्षांत 30 योजना 
राजिपच्या पेण-सुधागड पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता डी. जी. डवले यांनी सांगितले की, सुधागड तालुक्‍यात अजून तरी पाणीटंचाई नाही. मेअखेरपर्यंत थोड्याफार प्रमाणात पाणीटंचाई भेडसावू शकते; मात्र तेथे उपाययोजना केल्या जातील. राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत मागील वर्षापर्यंतची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षीची कामे सुरू आहेत. मागील तीन वर्षांत जवळपास ३० नळपाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या असून त्याचा लाभ ग्रामस्थांना होत आहे.

जलयुक्त शिवाराच्या कामामुळे सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. भूजल पातळी व जलस्रोत वाढत आहेत. त्यामुळे अनेक गावांचा पाणीटंचाईचा प्रश्‍न सुटला आहे. त्याबरोबरच तालुक्‍यातील रब्बी पिकांचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 
- अनिल रोकडे, सुधागड तालुका कृषी अधिकारी

पाणीटंचाईसंदर्भात सध्या कुणाची तक्रार आलेली नाही. सगळीकडे पुरेसे पाणी आहे. सध्या पाणीटंचाईची तीव्रता नाही. मेअखेरीस काही ठिकाणी पाणीटंचाई भेडसावू शकते. टंचाई कृती आराखड्यानुसार कामे सुरू आहेत.
- विनायक म्हात्रे, गटविकास अधिकारी, सुधागड-पाली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com