केळवली आरोग्य केंद्रात पाणीटंचाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

राजापूर - गेल्या काही दिवसांत वाढलेल्या उष्म्याचा आतापासूनच फटका बसू लागला आहे. तालुक्‍यामध्ये पाणीटंचाईच्या झळा मार्च महिन्यापासून बसत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, केळवली आणि धाऊलवल्ली येथील तरबंदर आणि गयाळकोकरी या वाड्यांनी पंचायत समिती प्रशासनाकडे पाण्यासाठी टॅंकरची मागणी केली आहे. त्यामुळे तालुक्‍यात यावर्षी लवकरच टॅंकर धावू लागणार आहे.

टॅंकरची मागणी केलेल्या गावांची तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्यामार्फत संयुक्त पाहणी झाल्यानंतर संबंधित गावांमध्ये टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली. वातावरणाचा प्रतिकूल परिणाम नैसर्गिक जलस्रोतांवर होऊ लागला आहे. विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून तालुक्‍यामध्ये दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही तालुक्‍याला दरवर्षी तीव्र पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. या समस्येमध्ये यावर्षीही फारसा फरक पडलेला नाही. यावर्षीही तालुक्‍यातील केळवली प्राथमिक आरोग्य केंद्रासह धाऊलवल्ली येथील तरबंदर आणि गयाळकोकरी या दोन वाड्यांना पाणीटंचाईची झळ पोचली आहे. त्यांनी पंचायत समिती प्रशासनाकडे टॅंकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. केळवली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी परिणाम होतोय; मात्र यावर्षी नव्याने धाऊलवल्लीचा समावेश झाला आहे. या वाड्यांना प्रादेशिक नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ही नळपाणी योजना गेल्या काही दिवसांपासून बंद असून त्यातून पाणीटंचाईची समस्या उद्‌भवली आहे. या गावांची पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि तहसीलदार संयुक्त पाहणी करणार असून त्यानंतर तेथे टॅंकर धावू लागेल.

Web Title: Water shortage