पाण्यासाठी महिलांची पायपीट; प्रशासनाचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

महाड - दरडग्रस्त गाव म्हणून ओळखले जाणारे दासगाव सध्या तहानलेले आहे. पाण्याअभावी इथली नळपाणी योजना बंद पडली आहे; तर विहिरी कोरड्या पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी दिवस-रात्रीचे नियोजन करत पाणी भरावे लागते. त्यातच या गावाचा समावेश टंचाई आराखड्यात झाला नसल्याने आणखीन एक संकट ग्रामस्थांसमोर उभे राहिले आहे.

महाड - दरडग्रस्त गाव म्हणून ओळखले जाणारे दासगाव सध्या तहानलेले आहे. पाण्याअभावी इथली नळपाणी योजना बंद पडली आहे; तर विहिरी कोरड्या पडल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी दिवस-रात्रीचे नियोजन करत पाणी भरावे लागते. त्यातच या गावाचा समावेश टंचाई आराखड्यात झाला नसल्याने आणखीन एक संकट ग्रामस्थांसमोर उभे राहिले आहे.

खाडीपट्ट्यातील गंधारपाले, केंबुर्ली, वहुर; तसेच दासगावलाही पाणीटंचाई जाणवू लागली आहे. तीन हजार लोकवस्ती असणाऱ्या या गावाला गांधारी नदीवर मोहोप्रे येथील जॅकवेलमधून दहा किलोमीटर लांबीच्या पाईप लाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गांधारी नदीला कोथुर्डे धरणातून सोडलेले पाणी मिळत असल्याने या पाणीसाठ्यावर दासगाव व इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो. मे महिन्यात धरणातून सोडले जाणारे पाणी गांधारी नदीत जॅकवेलला येत नसल्याने दासगावचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे.

त्यामुळे दासगावच्या पश्‍चिमेकडे लोकवस्तीच्या भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या भागात केवळ दोन विहिरी असुन यातील बंदराजवळच्या विहिरीने तळ गाठला आहे. या पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी ग्रामस्थांनी पाणी भरण्यासाठी वेळ ठरवली आहे. हे पाणी भरण्याचे काम अहोरात्र करावे लागत असल्याने लोकांच्या नोकरी व्यवसायावर याचा परिणाम होत आहे. पश्‍चिमेकडील लोकवस्ती डोंगरात व दाटीवाटीने असल्याने या ठिकाणी वाहन जाऊ शकत नाही. अशा वेळी महिलांना डोक्‍यावरून व सायकलवरून पाणी न्यावे लागत आहे. तर हॉटेल व दुकानदारांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.

गावात एक मोठा तलाव आहे; मात्र या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ काढण्यास मोठा खर्च अपेक्षित आहे. ग्रामपंचायतीला हा खर्च परवडणारा नाही. सरकारकडून निधी प्राप्त झाल्यास गाळ काढून हे पाणी वापरात येणे शक्‍य आहे. 

दासगावचा टंचाई आराखड्यात समावेश करावा, अशी मागणी प्रांताधिकाऱ्यांकडे केलेली आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यता न मिळाल्याने टॅंकर मिळणे अवघड झाले आहे. 
- दिलीप उकिर्डे, माजी ग्रामपंचायत सदस्य.

Web Title: water shortage in dasgav