‘जामगे’च्या ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या झळा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

पाण्यासाठी पायपीट - अजूनही टॅंकर सुरू नाही
दाभोळ - उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाच दापोली तालुक्‍यातील जामगे देवाच्या डोंगरावरील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या चांगल्याच झळा बसायला लागल्या आहेत. पाण्यासाठी मुकी जनावरे आणि ग्रामस्थांची दाहीदिशा वणवण सुरू झाली आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी शासनाकडे टॅंकरची मागणी केली असली तरी अजूनही शासनाने टॅंकर सुरू न केल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

पाण्यासाठी पायपीट - अजूनही टॅंकर सुरू नाही
दाभोळ - उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाच दापोली तालुक्‍यातील जामगे देवाच्या डोंगरावरील ग्रामस्थांना पाणीटंचाईच्या चांगल्याच झळा बसायला लागल्या आहेत. पाण्यासाठी मुकी जनावरे आणि ग्रामस्थांची दाहीदिशा वणवण सुरू झाली आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी येथील ग्रामस्थांनी शासनाकडे टॅंकरची मागणी केली असली तरी अजूनही शासनाने टॅंकर सुरू न केल्याने ग्रामस्थांचे हाल होत आहेत.

धनगर समाज कोकणातील डोंगर-दऱ्यांत वसला आहे. या धनगरवाड्यांकडे शासनाचे आजही दुर्लक्षच होत आहे. दापोली तालुक्‍यातील जामगे देवाच्या डोंगरावरील वस्तीकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते.

समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार मीटर उंचीवर वसलेल्या देवाच्या डोंगरावर धनगर समाजाच्या ४ वाड्या आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील दापोली तालुक्‍यातील जामगे देवाचा डोंगर, खेड तालुक्‍यातील तुळशी देवाचा डोंगर आणि मंडणगडमधील भोळवली देवाचा डोंगर, तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्‍यातील ताम्हाणी देवाचा डोंगर या चारही वाड्यांमध्ये पाणीटंचाई आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते मे पर्यंत या वस्तीला पाणीटंचाईच्या झळा बसतात. टॅंकरने पाणीपुरवठा हा तात्पुरता इलाज असतो. शासनाकडून प्रत्येक वर्षी पाण्याचा टॅंकर पुरविला जातो. तो एक दिवसाआड असल्याने देवाच्या डोंगरावरील धनगर समाजाच्या एका कुटुंबाला एक दिवसाआड केवळ चार हंडे पाणी टॅंकरने मिळते. ते माणसांनी प्यायचे की मुक्‍या जनावरांना पाजायचे, तसेच अंघोळ, कपडे धुण्याचे काय करायचे असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे.

टॅंकरच्या चार हंड्याच्या पाण्याने गरज भागत नसल्याने या लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. देवाचा डोंगरावर शासनाने विहीर व तळी बांधल्या आहेत. कोट्यवधी रुपये खर्चून बंधारे बांधले; मात्र पाण्याचे स्रोतच नसल्याने या विहिरी उन्हाळ्यात कोरड्या पडतात. दोन-तीन विहिरींना किरकोळ पाणी असते. देवाच्या डोंगरावरील विहिरी कोरड्या पडल्यावर ग्रामस्थांची पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट सुरू होते. हंडाभर पाण्यासाठी किमान १० किलोमीटरची पायपीट सुरू होते. पाझर झऱ्यावर हंडाभर पाण्यासाठी वाडीतील सर्वांची गर्दी झालेली असते. या समाजाकडे पूर्वापार पशुधन आहे. शेती नाही. रोजगाराचे कोणतेही साधन नाही. मजुरीसाठी दररोज ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करावी लागते.

उदरनिर्वाहासाठी पारंपरिक पद्धतीने गुरं-ढोरे सांभाळली जातात. त्यामुळे आजही या लोकांकडे गायी, म्हशी, शेळ्या आहेत. पशुधनावर त्यांची उपजीविका अवलंबून आहे. शासनाकडे पाण्याच्या टॅंकरची मागणी करूनही म्हणावी तशी दखल घेतली गेलेली नाही.

Web Title: water shortage in jamage