कर्जतच्या धाबेवाडी मधील महिलांची रात्र विहिरीवर

neral
neral

नेरळ - कर्जत तालुक्यातील खांडस ग्रामपंचायतीमधील धाबेवाडीमध्ये तीव्र पाणीटंचाईला आदिवासी ग्रामस्थांना सामोरे जावे लागत आहे. विहिरींनी तळ गाठल्याने दगडात झिरपणारे पाणी साठवून ते आपल्या हंड्यात पडावे यासाठी या आदिवासी वाडीमधील महिला रात्र विहिरीवर काढतात. कर्जतच्या आदिवासी भागात असे प्रकार नेहमीचे झाले असल्याने आदिवासी लोक लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार करीत आहेत. तर शेजारी असलेल्या बांगरवाडी मधील महिला घुटेवाडीत असलेल्या बंधाऱ्यामध्ये असलेल्या विहीरीवर  जाऊन गढूळ पाणी घरी घेऊन येत आहेत.

धाबेवाडी ही आदिवासी वाडी 40 घरांची वस्ती असलेली वाडी असून खांडस ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या या वाडीत दरवर्षी उन्हाळ्यात पाणीचे दुर्भिक्ष्य जाणवते. या वाडीपासून दीड किलोमीटर अंतरावर घुटेवाडी येथे एक मातीचा बंधारा असून दगड मातीने भरलेल्या या बंधाऱ्याच्या मध्यभागी असलेल्या विहिरीमधील पाणी घुटेवाडी ग्रामस्थ नेत असतात. दुसरीकडे त्याच पाण्यावर मागील काही वर्षांपासून धाबेवाडी ग्रामस्थांना देखील विसंबून राहावे लागत आहे. त्यामुळे त्या विहिरीतील पाण्याने देखील तळ गाठला आहे. त्यात मातीच्या बंधाऱ्याचे मध्यभागी विहीर असल्याने बंधाऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक लोक पाणी मिळविण्यासाठी डवरे खोदून त्यात साठणारे पाणी हंड्यात भरून नेत असतात.मात्र आदिवासी ग्रामस्थ यांचा राबता बंधाऱ्यात असल्याने बंधाऱ्याचे मध्यभागी असलेली विहिरीत गढूळ पाणी साठून राहत आहे.शेवटी तेच गढूळ पाणी धाबेवाडी ग्रामस्थांना आणावे लागत आहे.तर घुटेवाडी येथील महिला तेथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या गावंडवाडी येथील बंधाऱ्यावर जाऊन पाणी आणत असतात.

पिण्याचे पाणी तरी चांगले मिळावे यासाठी धाबेवाडी मधील आदिवासी महिला रात्री विहिरीवर मुक्काम करतात. 40 घरातील महिलांना दिवसाआड चार हांडे पाणी विहिरीवर तासनतास थांबल्यानंतर मिळत असते. दुसरीकडे किमान 10 घरातील महिला रात्रीचे जेवण उरकून 9 वाजता विहीर गाठतात आणि तेथे काळोखात बसून विहिरीत असलेल्या झऱ्यामधील पाणी साठल्यानंतर घरी घेऊन जातात आणि विश्रांती घेतात असे दैनंदिन कामकाज धाबेवाडी मधील महिलांचे झाले आहे.या भागातील केवळ धाबेवाडी मध्ये नाही तर परिसरात असलेल्या बांगरवाडी, पेटारवाडी, चाफेवाडी, वडाचीवाडी, मेंगाळवाडी, पादिरवाडी आणि जांभूळवाडी मध्ये ही स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणखी काही दिवस या आदिवासी वाड्यामधील महिलांना विहिरीवर आणि बंधाऱ्यातील पाणी मिळणार आहे, पण त्यानंतर या सर्व आदिवासी वाड्यातील महिलांच्या नशिबी रात्र विहिरीवर काढण्याचे संकट डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे या भागातील आदिवासी लोकांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार सुरू केला आहे. 

दरम्यान,या सर्व आदिवासी वाड्या शासनाच्या पाणी टंचाईग्रस्त आराखड्यात समाविष्ट आहेत. तर सर्व वाड्यांना शासनाने ट्रँकरने पाणी पुरवठा करावा म्हणून मागणी प्रस्ताव खांडस ग्रामपंचायतने दिला आहे. परंतु, गेल्या महिन्यापासून या सर्व आदिवासी वाड्या ट्रँकरच्या पिण्याचे पाण्यापासून वंचित आहेत.

या आदिवासी वाड्यातील स्थिती बद्दल ट्रँकरची मागणी करणारे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवले आहेत.शासनाचे आदेश आल्यानंतर तात्काळ ट्रँकर सुरू केले जातील.
- तहसीलदार अविनाश कोष्टी

आम्ही सातत्याने नळपाणी योजनेची मागणी करून शासन आम्हाला विहीर खोदून देत असते.परंतु त्या विहिरीमध्ये मार्च महिना यायला पाणी संपून जाते,त्यामुळे भरीव काम करून आदिवासी लोकांना रात्र जागण्याची वेळ आणू नये.
- कांता पादिर-उपाध्यक्ष आदिवासी आदिवासी संघटना

आम्ही किमान गरजांसाठी दरवेळी शासनाला उपोषण करण्याची धमकी द्यायची का?शासनाचे काळीज आदिवासी लोकांना पाणी देण्यासाठी गंभीर नाही का? हा प्रश्न उपस्थित राहत असून आम्ही सर्वांनी येत्या 29 एप्रिलला येत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा विचार करतोय.
- किसन वारघडे-वयोवृद्ध स्थानिक आदिवासी 

ही पाणीटंचाई या वर्षी आलेली नाही, आपण ग्रामस्थांची मागणी येताच ट्रँकरची मागणी कर्जत पंचायत समितीकडे केली आहे. मात्र शासनाने आम्हाला ट्रँकर बद्दल कोणतीही सूचना केली नाही. मात्र पुढील चार वर्षाच्या काळात खांडस ग्रामपंचायत मधील सर्व आदिवासी वाड्यामधील महिलांना विहिरीवर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागणार नाही असे नियोजनबद्ध कामाचा प्रयत्न सुरू केला आहे.
- मंगल ऐनकर-सरपंच खांडस ग्रामपंचायत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com