खेड, चिपळूण, संगमेश्‍वरातील १७ वाड्या टंचाईग्रस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा - विंधन विहिरींची खोदाई अडकली
रत्नागिरी - राज्यात उष्म्याची लाट निर्माण झाली आहे. त्याचा फटका कोकणालाही बसत आहे. वाढत्या उष्म्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे सावटही वाढत आहे. खेड, चिपळूण आणि संगमेश्‍वरमधील ११ गावांतील १७ वाड्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. हे आकडे दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत. त्याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.

सात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा - विंधन विहिरींची खोदाई अडकली
रत्नागिरी - राज्यात उष्म्याची लाट निर्माण झाली आहे. त्याचा फटका कोकणालाही बसत आहे. वाढत्या उष्म्याने ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे सावटही वाढत आहे. खेड, चिपळूण आणि संगमेश्‍वरमधील ११ गावांतील १७ वाड्यांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. हे आकडे दिवसेंदिवस वाढत जाणार आहेत. त्याला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत.

पारा चढत गेल्यामुळे जिल्ह्याचे तापमानही ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. उन्हाच्या काहिलीने ग्रामीण भागातील अनेक विहिरींची पाणीपातळी तळाला गेली आहे. कातळासह डोंगरावरील गावे, वाड्यांना टंचाईची सर्वाधिक झळ बसू लागली आहे. धनगरवाड्यांतील लोकांना काही  किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पंधरा दिवस उशिराने टॅंकर सुरू झाला आहे. खेड तालुक्‍यातच त्याची सुरवात झाली. सर्वाधिक टॅंकरची मागणी चिपळूण तालुक्‍यात आहे. ५ गावांतील १० वाड्यांमध्ये टंचाई भासत आहे. त्यांना २ टॅंकरद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. खेड तालुक्‍यात ५ गावांतील ६ वाड्यांमध्ये टंचाई असून चार टॅंकरने पाणी दिले जाते. संगमेश्‍वरमध्ये एक वाडी टंचाईग्रस्त आहे. तेथे १ टॅंकर पाठविला जातो. गतवर्षी याच कालावधीत एवढीच गावे बाधित होती.

जिल्ह्याचा टंचाई आराखडा पावणेतीन कोटी रुपयांचा आहे. त्यात टॅंकरसाठी ३५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. नादुरुस्त नळ-पाणी योजनांच्या दुरुस्तीसाठी पावणेदोन कोटीचा निधी आहे. उर्वरित निधी विंधन विहिरींसाठी ठेवला आहे. विंधन विहिरींची कामे सुरू करण्यासाठी विलंब होत असल्यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये पुढील पंधरा दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. निविदा प्रक्रियांमध्ये विंधन विहिरींची खोदाई अडकली आहे. ही प्रक्रिया वेगाने करावी अशा सूचना प्रशासनाकडून जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाला दिल्या आहेत.

जलवाहिनी फुटल्याने संताप
रत्नागिरी शहरात जिल्हा परिषद स्टॉपजवळ गटार दुरुस्तीचे काम सुरू आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी या गटारामधून जाते. काम सुरू असताना ती फुटली. सकाळच्यावेळी हा प्रकार घडल्याने जलवाहिनीचे रूपांतर कारंज्यात झाले. पाण्याचे फवारे रस्त्यावर उडत होते. हजारो लिटर पाणी त्यातून वाहून जात होते. पाण्याचे फवारे उडू लागल्यानंतर एकच गोंधळ उडाला. शहरात मोठ्या प्रमाणात टंचाई जाणवत आहे. त्या परिस्थितीत पाणी वाहताना पाहून नागरिकांचा संताप झाला. एक तासानंतर पाणी बंद करण्यात यश आले. फुटलेला पाइप दुरुस्त करण्याचे काम पालिकेकडून तत्काळ हाती घेण्यात आले होते.

Web Title: water shortage in village