कर्जत तालुक्यातील सोलनपाडा पाझर तलावाने गाठला तळ

संतोष पेरणे
शनिवार, 27 एप्रिल 2019

नेरळ : कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथे असलेल्या जामरुख पाझर तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे धरणामधून खाली नदीमध्ये पाणी सोडण्याचे बंद झाले असून त्या परिसरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, नदीमध्ये धरणाचे पाणी येणे बंद झाल्यामुळे चिल्लार नदी कोरडी झाली असून त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या आठ नळपाणी योजना कोलमडून गेल्या आहेत.

नेरळ : कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथे असलेल्या जामरुख पाझर तलावाने तळ गाठला आहे. त्यामुळे धरणामधून खाली नदीमध्ये पाणी सोडण्याचे बंद झाले असून त्या परिसरात अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, नदीमध्ये धरणाचे पाणी येणे बंद झाल्यामुळे चिल्लार नदी कोरडी झाली असून त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या आठ नळपाणी योजना कोलमडून गेल्या आहेत.
   
तालुक्यातील सोलनपाडा येथे रायगड जिल्हा परिषदेने बांधलेला पाझर तलाव असून त्या तलावाची दुरुस्ती शासनाने केली होती. त्यामुळे धरणाचे आयुष्य वाढले होते. त्या धरणातील पाणी तेथून वाहणाऱ्या चिल्लार नदीमध्ये सोडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघाला होता. परंतु, धरणातील मातीचा गाळ काढण्याचे काम अनेक वर्षे जिल्हा परिषद लघुपाटबंधारे विभागाने केले नाही. परिणामी आज धरणाच्या जलाशयात पाणी साठा कमी प्रमाणात होत आहे. धरणाचे पाणी खाली असलेल्या शेतीसाठी आणि चिल्लार नदीमध्ये सोडण्यासाठी पाईप लाईन टाकून बोगदा निर्माण केला आहे. मात्र यावर्षी त्या बोगद्याच्या खाली धरणातील पाणी गेले आहे. परिणामी मागील आठ दिवसांपासून धरणाचे पाणी खाली नदीमध्ये सोडणे बंद झाले आहे. परिणामी चिल्लार नदी कोरडी पडली असून धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना देखील कोलमडून गेल्या आहेत.

धरणाच्या पाण्यावर पूर्वी शेती केली जात असे आणि ते पाणी चिल्लार नदीमध्ये गेल्यानंतर त्या पाण्यावर नळपाणी योजना लघुपाटबंधारे विभागाने केल्या होत्या. धरणात जेमतेम 15 टक्के पाणीसाठा असून ते डेड म्हणून ठेवण्याची प्रथा असल्याने या भागातील जनतेच्या तोंडचे पाणी पळून गेले आहे. नदीमध्ये विहीर खोदून नळपाणी योजना बनविल्या गेल्या आहेत पण, नदी कोरडी पडल्याने विहिरी देखील कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे सोलनपाडा, कामतपाडा, हिरेवाडी, रजपे, टेबरे, शिंगढोल, आंबिवली आणि त्या परिसरातील आदिवासी कातकरी वाड्या यांच्या नळपाणी योजना अवलंबून आहेत. या सर्व नळपाणी योजना नदी कोरडी पडल्याने बंद झाल्या आहेत. त्यामुळे 12 गावातील लोकांच्या तोंडचे पाणी पळून गेले आहे. याबाबत काही उपाययोजना करण्याची मागणी टेंबरे ग्रामपंचायतकडून करण्यात येत आहे. धरणाच्या पाण्याने तळ गाठला असल्याने पाणी पुरवठा कसा करायचा? हा निर्माण झालेला प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या कामात सर्व अधिकारी वर्ग अडकून पडल्याने सुटला जात नाही.

''धरणात कमी पाणी साठा असल्याने पाणी नदीमध्ये सोडण्याचे बंद झाले आहे. पण त्यामुळे आमच्या भागात प्रचंड पाणीटंचाई निर्माण झाली आहे.त्यावर मात करण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने धरणातील पाणी पंप लावून बाहेर काढावे आणि आमची तहान भागवावी.''
- पंढरीनाथ पिंपरकर-सदस्य,ग्रामपंचायत

''धरणात मोठ्या प्रमाणात माती आणि दगड यांचा गाळ साचला असून तो काढला जात नसल्याने पाणी साठा कमी होत आहे.त्यामुळे यावर्षी धरणातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्यावी.''
- हरेश घुडे-माजी सरपंच

''धरणात डेड पाणी साठा ठेवावा लागतो,त्याप्रमाणे पाणी त्यात ठेवण्यात आले आहे.मात्र पाणी टंचाई लक्षात घेता त्यावर उपाययोजना करण्याचा विचार सुरू आहे.''
- आर डी कांबळे-उपअभियंता,लघुपाटबंधारे विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water In the Solanpada Pazar lake reached lowest level