नगरसेविकांच्या पतींमध्ये पाणी टॅंकरवरून हातघाई

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

रत्नागिरी - पालिकेमध्ये आज सत्ताधारी शिवसेनेच्या दोन नगरसेविकांच्या पतींमध्ये जोरदार झोंबाझोंबी झाली. पाण्याचा टॅंकर मिळण्यावरून वादाला तोंड फुटले आणि एकमेकांवर धाऊन जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. अखेर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून या वादावर पडदा पाडण्यात आला, मात्र एकमेकांविषयी त्यांच्या मनात प्रचंड रोष दिसत होता.

रत्नागिरी - पालिकेमध्ये आज सत्ताधारी शिवसेनेच्या दोन नगरसेविकांच्या पतींमध्ये जोरदार झोंबाझोंबी झाली. पाण्याचा टॅंकर मिळण्यावरून वादाला तोंड फुटले आणि एकमेकांवर धाऊन जाण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. अखेर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून या वादावर पडदा पाडण्यात आला, मात्र एकमेकांविषयी त्यांच्या मनात प्रचंड रोष दिसत होता.

प्रत्येक नगरसेवक आणि काही नगरसेविकांचे पतिराज आपल्या प्रभागात पुरेसे पाणी मिळण्यासाठी धडपडत असतात. नगरसेविका हळदणकर यांच्या प्रभागामध्ये गटार तुंबले होते. सफाई कामगारांनी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यांना अपयश आले. अखेर बारक्‍याशेठ हळदणकर यांनी नगराध्यक्ष राहुल पंडित यांना फोन करून अग्निशमन बंब मागवला. उच्च दाबाने पाणी मारून ते गटार साफ करण्याचा प्रयत्न करणार होते. बराचा अवधी गेला तरी बंब आला नाही, म्हणून हळदणकर पालिकेत आले. त्यांनी पाणी विभागाकडे पाण्याच्या टॅंकरची मागणी केली. 

तेव्हा नगरसेविका दिशा साळवी यांचे पती बाळू साळवी त्या ठिकाणी होते. त्यांनी या विषयात तोंड घातले. ‘टॅंकर मिळणार नाही, स्टेडिअमवर मुलांना पाणी लागणार आहे. त्यासाठी तो नेणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. 

हळदणकर यांनी ‘मला पाच मिनिटे लागणार आहेत. गटार साफ झाले, की तू घेऊन जा,’ असे सांगितले. मात्र साळवी यांनी ‘काही झाले तरी टॅंकर देणार नाही,’ असे सुनावल्याने  हळदणकर यांनीही आवाज चढवला. दोघांमध्ये जोरदार शाब्दिक 
बाचाबाची झाली. 

अगदी अंगावर धावून जाण्यापर्यंत वेळ आली. कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर वाद थांबला. दरम्यान, दुपारपर्यंत ही धुसफूस सुरू होती. विभागप्रमुख, शहरप्रमुख आदींनी एकत्र येऊन या विषयावर पडदा टाकला.

पतिराजांचा हस्तक्षेप वाढला
पालिकेतील काही नगरसेविकांच्या पतींचा कारभारात हस्तक्षेप वाढल्याबाबत चर्चा सुरू आहे. पालिका प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. अनेक नगरसेविकांचे पतिराज पालिकेत तंबू ठोकून असतात. नगरसेविका बाजूला राहतात आणि त्यांचाच राबता असतो.

Web Title: water tanker issue in Ratnagiri corporation

टॅग्स