पाणीपट्टीवाढीवरून विरोधकांत दुफळी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सावंतवाडी - येथील पालिकेचा आज शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या वेळी वाढीव पाणीपट्टीवरून विरोधकांत दुफळी दिसून आली. पाणीपट्टीवाढीला आपला विरोध आहे, असे नगरसेवक राजू बेग यांनी सांगितले, तर किंमत वाढवा; परंतु त्या माध्यमातून मिळालेले पैसे पाणीपुरवठा योजनेवरच खर्च करा, अशी मागणी नगरसेवक परिमल नाईक यांनी केली. 

सावंतवाडी - येथील पालिकेचा आज शिलकी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या वेळी वाढीव पाणीपट्टीवरून विरोधकांत दुफळी दिसून आली. पाणीपट्टीवाढीला आपला विरोध आहे, असे नगरसेवक राजू बेग यांनी सांगितले, तर किंमत वाढवा; परंतु त्या माध्यमातून मिळालेले पैसे पाणीपुरवठा योजनेवरच खर्च करा, अशी मागणी नगरसेवक परिमल नाईक यांनी केली. 

येथील पालिकेची विशेष सभा आज येथे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी २०१७-१८ चा पंधरा कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर झाला. या वेळी झालेल्या चर्चेत स्थायी समितीकडून घेतलेल्या निर्णयात आणि सभागृहात मांडलेल्या विषयात काही बदल असल्यामुळे विरोधकांकडून आक्षेप नोंदविला. चुकीची माहिती सभागृहाला दिली जात असल्याचे नगरसेवक सुधीर आडीवरेकर, नासीर शेख यांनी सांगितले. या वेळी संबंधित ठराव हा सभागृहात घ्यायचा आहे. यामुळे चुकीचे आरोप नको, असे नगराध्यक्ष साळगावकर यांनी सुनावले.

या वेळी सादर केलेल्या अर्थसंकल्पात शहरातील पाणीपट्टी वाढविली आहे. दर हजार लिटरमागे आतापर्यंत सहा रुपये घेण्यात येत होते; मात्र आता ती रक्कम नऊ रुपये केल्याचे नगराध्यक्ष साळगावकर यांनी सांगितले. या वेळी चुकीच्या पद्धतीने पैसे वाढवून लोकांना नाहक वेठीस धरू नका, असा आरोप विरोधी गटांच्या नगरसेवकांकडून केला. या वेळी पाणीपुरवठा योजनेची काही कामे बाकी असल्यामुळे काही रक्कम वाढविली आहे आणि तसा निर्णय घेणे गरजेचे आहे, असे साळगावकर यांनी सांगितले. या प्रक्रियेला नगरसेवक बेग यांनी विरोध केला; मात्र वाढीव पैसे योजनेच्या नूतनीकरणासाठी वापरा, असे श्री. नाईक यांनी सांगितले. 

या वेळी शहरातील भुयारी गटार योजनेसाठी काय तरतूद केली आहे, असे प्रश्‍न श्री. शेख यांनी करून पालिकेने या प्रश्‍नावर आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगितले. तसेच शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे नगराध्यक्षांनी नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन प्रभावी योजना राबवावी, अशी मागणी केली. या वेळी ॲड. नाईक यांनी चुकीच्या पद्धतीने शहरात होणाऱ्या कॉम्प्लेक्‍सवर लक्ष द्यावे, तेथील गटार सुधारण्यासाठी योग्य ते बंधन घालण्यात यावे, तसेच काही कॉम्प्लेक्‍सबाबत तक्रारी आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. 

या वेळी चांगला अर्थसंकल्प सादर केल्याने भाजपचे नगरसेवक आनंद नेवगी यांनी नगराध्यक्ष साळगावकर यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला. या वेळी सभा संपल्यानंतर विरोधी आणि सत्ताधारी गटात आरोप-प्रत्यारोप रंगले. यावर सभा संपली आहे, असे सांगून स्वीकृत नगरसेवक मनोज नाईक यांनी विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला. 

नगराध्यक्षांना मिळणार आलिशान गाडी 
नव्या अर्थसंकल्पात नगराध्यक्षांच्या गाडीसाठी पंचवीस लाखांची तरतूद केली. या वेळी ॲड. नाईक यांनी ही चांगली बाब आहे, असे सांगून जुन्या गाडीवर खर्च करण्यापेक्षा नवी गाडी घ्या, असे सांगितले. आपला नगराध्यक्ष चांगल्या गाडीतूनच फिरला पाहिजे; मात्र ती गाडी अन्य कोणी वापरू नये, अशी या वेळी मागणी करण्यात आली. या प्रक्रियेला श्री. बेग यांनी अनुमोदन दिले.

Web Title: Water tax for the growth of the opposition faction