काळा पैसा निर्माणासाठी आपणच जबाबदार - चंद्रशेखर ठाकूर

काळा पैसा निर्माणासाठी आपणच जबाबदार - चंद्रशेखर ठाकूर

रत्नागिरी - आपण प्रामाणिकपणे नोकरी करतो; पण आपल्याला त्याचा फायदा, यश मिळत नाही. भ्रष्टाचार, काळा पैसा, लाचलुचपत यामुळे मेहनतीवर पाणी पडते. काळा पैसा निर्माण करायला आपणही तितकेच जबाबदार आहोत. त्यामुळे कॅशलेस व डिजिटल व्यवहार करा, म्हणजे काळा पैसा कमी होईल. स्मार्ट फोन, बॅंकेतील खाते व क्रेडिट कार्ड याआधारे डिजिटल व्यवहार शक्‍य आहेत; पण माणसांची इच्छा नसते, ही इच्छा निर्माण करा आणि पुरेशी खबरदारी, सावधानता बाळगा म्हणजे फसवणूक होणार नाही, असा सल्ला ज्येष्ठ सीडीएसएलचे चंद्रशेखर ठाकूर यांनी दिला.
‘सकाळ-मधुरांगण’ व जनता सहकारी बॅंकेच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित ‘आज रोख, उद्या डिजिटल’ कार्यक्रमात ते बोलत होते. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या नूतन कार्याध्यक्ष श्रीमती शिल्पा पटवर्धन, जनता बॅंकेचे शाखा व्यवस्थापक जयंत लोकरे, ‘सकाळ’चे वरिष्ठ जाहिरात प्रतिनिधी दत्तप्रसन्न कुळकर्णी उपस्थित होते.

मधुरांगणच्या संयोजिका श्रद्धा तेरेदेसाई यांनी सूत्रसंचालन केले.
श्री. लोकरे यांनी सांगितले, की नोटाबंदीच्या काळात जनता बॅंकेतून सर्व व्यक्तींना नियमानुसार पैसे देण्यात आले. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना योग्य माहिती दिली जात असून ग्राहक ती समजून घेत आहेत. प्रत्येक ग्राहकाला एटीएम कार्ड, चेकबुक देऊन कॅशलेस व्यवहारांसाठी बॅंक विशेष मेहनत घेत आहे. आपला पासवर्ड कोणालाही सांगू नका व खोट्या फोनद्वारे फसवणूक होण्याची भीती असल्याने सावध राहा, असा सल्ला त्यांनी दिला. श्री. ठाकूर यांनी सांगितले, की पगार थेट बॅंक खात्यात जमा होतो व आपण ते पैसे काढून दैनंदिन खर्चासाठी वापरतो. म्हणजे पांढरे पैसे काळे करतो. दुकानात कोणत्याही वस्तूची पावती घेत नाही. दुकानदार कर भरत नाही व ते पैसे काळे होतात व देशाचे नुकसान होते. अर्धा टक्‍क्‍याने सुरू झालेला सेवा कर आता पंधरा टक्‍क्‍यांवर पोचला आहे. पुढील वर्षभरात पॉस मशीन प्रत्येक व्यावसायिकाकडे असेल. त्यामुळे आपण एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करू शकू. खिशात पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही.

ई वॉलेटद्वारे व्यवहार कसे करावेत, याची सविस्तर माहिती ठाकूर यांनी स्लाइड शोद्वारे दिली. ई वॉलेटसाठी स्मार्ट मोबाइल, बॅंक खाते व डेबिट कार्डची गरज आहे. दैनंदिन वस्तू खरेदी व दहा हजार रुपयांच्या व्यवहारांसाठी ई वॉलेटचा उपयोग करता येतो; मात्र गरज भासेल तेवढीच रक्कम ई वॉलेटद्वारे वापरावी, असा सल्ला त्यांनी दिला. केंद्र सरकारच्या ‘भीम’ या नवीन ॲपची माहितीही त्यांनी दिली.
 

जनता बॅंकेच्या डिजिटल योजना
जनता सहकारी बॅंकेच्या डिजिटल योजनांची माहिती डाटा सेंटरच्या कौस्तुभ जोशी यांनी दिली. एनईएफटी, आरटीजीएसद्वारे व्यवहार, पॉस मशीन, बीबीपीएस, नेट बॅंकिंग, एसएमएस बॅंकिंग आदींची सविस्तर माहिती दिली. रुपे डेबिट कार्ड, कार्ड स्वाइप मशीनद्वारे व्यवहार सुलभ होतात व रोख पैसे नसले तरीही व्यवहार अडत नाही, असे त्यांनी सांगितले.

‘सकाळ’सोबत अनेक कार्यक्रम
श्री. ठाकूर यांचा आजचा १३१४ वा कार्यक्रम होता. महाराष्ट्रात ‘सकाळ’सोबत मी अनेक कार्यक्रम केल्याचे ठाकूर यांनी सांगितले. आर्थिक साक्षरतेसाठी ‘सकाळ’ने पुढाकार घेतला असून, याबद्दल त्यांनी विशेष कौतुक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com