यशासाठी अपयशाचे आव्हान स्वीकारणे गरजेचे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

अलिबाग - अपयश हे जीवनातील एक आव्हान आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी ते स्वीकारून पुढे जाण्याची गरज असते. आयुष्यात आधी ध्येय निश्‍चित करावे लागते, असा यशाचा मंत्र पॅरॉलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पहिले सुवर्णपदक पटकावलेल्या सुयश जाधव याने येथील विद्यार्थ्यांना दिला.

अलिबाग - अपयश हे जीवनातील एक आव्हान आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी ते स्वीकारून पुढे जाण्याची गरज असते. आयुष्यात आधी ध्येय निश्‍चित करावे लागते, असा यशाचा मंत्र पॅरॉलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पहिले सुवर्णपदक पटकावलेल्या सुयश जाधव याने येथील विद्यार्थ्यांना दिला.

पीएनपी महाविद्यालयाच्या ‘प्रभाविष्कार क्रीडा स्पर्धे’चे उद्‌घाटन सुयशच्या हस्ते झाले. या वेळी त्याने विद्यार्थ्यांना आपला जीवनप्रवास सांगितला. ‘‘सोलापूरमध्ये जन्म झाला. जलतरणपटू होण्याचा वारसा लहानपणीच वडिलांकडून मिळाला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकण्याची वडिलांची इच्छा अपूर्ण राहिली. ती पूर्ण करण्याचा दृढ निश्‍चय केला होता. त्याच वेळी सहावीत घडलेली एक दुर्घटना आयुष्यात ‘टर्निंग पॉईंट’ ठरली’’, असे त्याने सांगितले. 

सुयश खेळत असताना असुरक्षित वीजतारांमुळे त्याला विजेचा धक्का बसला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला दोन्ही हात गमवावे लागले; परंतु जिद्द, चिकाटी त्याला शांत बसू देत नव्हती. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर विकलांगांसाठीच्या देशातील वेगवेगळ्या जलतरण स्पर्धांत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकून वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे.

या वेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, पीएनपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, उपप्राचार्या संजीवनी नाईक, होली चाईल्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका गीतिका भूचर, पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रिना म्हात्रे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापक नीलेश मगर, बी.एड्‌.च्या प्राचार्या एस. ससाणे, एम.एम.एस.चे प्राचार्य अनुज मिश्रा, जनसंपर्क अधिकारी अमोल नाईक, क्रीडा प्रशिक्षक तेजस म्हात्रे उपस्थित होते.

खेळातून करिअर 
क्रीडा फेडरेशनने घेतलेल्या रशियातील विश्‍वचषक स्पर्धेत सुयशला एक कास्यपदक मिळाले. पॅरॉलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरला. ही आयुष्यातील सर्वात लक्षवेधी कामगिरी ठरली, असे त्याने सांगितले. क्रीडा स्पर्धांनी नेहमीच जगाचे लक्ष वेधले आहे. याच क्षेत्रात विद्यार्थी उत्तम करिअर घडवू शकतात, हे सिद्ध करून दाखवले, असा स्वानुभवाचा दाखला त्याने दिला.

Web Title: We need to accept the challenge to the success of failure