कोणी आम्हाला शिक्षक देता का? - सिंधुदुर्गातील शालेय विद्यार्थ्यांची मागणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सिंधुदुर्गनगरी - मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमध्ये विज्ञान विषय शिकविण्यासाठी कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करावी, या प्रमुख मागणीसाठी मळेवाड ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी आजपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले.

सिंधुदुर्गनगरी - मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमध्ये विज्ञान विषय शिकविण्यासाठी कायमस्वरूपी शिक्षकांची नेमणूक करावी, या प्रमुख मागणीसाठी मळेवाड ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी आजपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले. पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी "कुणी आम्हाला शिक्षक देता का ?' असा सवाल प्रशासनाला विचारला आहे.

तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमध्ये विज्ञान विषय शिकविण्यासाठी कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. समायोजन चूकीच्या पध्दतीने झाल्याने मळेवाड हायस्कूलला विज्ञान विषय शिकविण्यासाठी शिक्षक मिळू शकला नाही. शिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना योग्य व आवश्‍यक शिक्षण देता यावे या दृष्टीने शिक्षक समायोजन प्रक्रीया राबविणे आवश्‍यक होते; मात्र त्यांच्याकडून कोणतीही योग्य अशी कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना लेखी पत्र देवूनही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे हे उपोषण सुरू करण्यात आले.

आम्हाला विज्ञान शिक्षक द्या, जोपर्यंत शिक्षक मिळत नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहील. आमचा प्राण गेला तरी चालेल प्रसंगी आत्मदहन करू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिला. माध्यमिक शिक्षणाधिकारी हे संस्था पदाधिकाऱ्यांच्या दबावाखाली आपले निर्णय घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीबाबत त्यांना देणे घेणे नाही. असा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.

यावेळी उमेश सावंत, हेमंत मराठे, महेश्‍वर कुंभार, चंद्रकांत मुळीक, तानाजी पेडणेकर, मिलींद पार्सेकर, परशुराम मुळीक, श्रीकांत नाईक, उदय वैद्य, दिपा इंन्सुलकर, दिपीका सावंत, देवयानी पायनाईक आदींसह ग्रामस्थ व हायस्कूलचे विद्यार्थी यात सहभागी झाले.

प्रमुख मागण्या

  • मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमध्ये कायमस्वरूपी विज्ञान शिक्षक द्यावा.
  • प्रयोगशाळेत प्रयोगासाठी आवश्‍यक उपकरणे घ्यावी.
  • मळेवाड हायस्कूलला कायमस्वरूपी शिपाई नेमावा.
  • मळेवाड हायस्कूलमध्ये रोस्टरप्रमाणे शिक्षक नेमणूक केली आहे का याची खातरजमा करावी.
  • मळेवाड हायस्कूलसाठी देखभाल दुरूस्तीसाठी किती निधी मिळाला व तो याच शाळेवर खर्च झाला आहे का याची खातरजमा करावी.

शिक्षणाधिकाऱ्यांची सारवासारव
उपोषणकर्त्या मळेवाड ग्रामस्थांना माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी भेट दिली. त्यांची मागणी जाणून घेतली मात्र संबंधीत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत विविध प्रश्‍नाचा भडीमार केला. यावेळी शिक्षणाधिकारी कडूस यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. याबाबत मी शिक्षक संचालकाकडे मार्गदर्शन मागवितो. या हायस्कूलला चार शिक्षक मंजूर आहेत. आणि सर्व जागा भरलेल्या आहेत असे स्पष्ट केले. मात्र त्यामध्ये विज्ञान शिकविणारा शिक्षक नसल्याने विज्ञान कोण शिकविणार? या प्रश्‍नाचे उत्तर त्यांना देता आले नाही.

Web Title: we want science teacher demand of student in Malewad