कोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू: उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

नाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करु शकणार नाही, कोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) जाहिर सभेत सांगितले.

नाणार (रत्नागिरी): नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार. तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करु शकणार नाही, कोकणावर अन्याय करणाऱयांची राखरांगोळी करू, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) जाहिर सभेत सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी नाणारमध्ये जाहीर सभा घेत, नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला. ते म्हणाले, 'कोकणाला उद्ध्वस्त केलं, तर तुम्हाला उद्ध्वस्त करु. महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या पवित्र भूमित शिवसेना नाणार प्रकल्प होऊ देणार नाही. त्यासाठी नाणारवासियांची एकजूट कायम ठेवा. कोकणवासियांच्या मूळावर उठणार प्रकल्प कशाला? कोकणातला हा प्रकल्प विदर्भात न्या. कोकणचं गुजरात होऊ देणार नाही. भूसंपादन होणार नाही म्हणजे प्रकल्पच होणार नाही. प्रकल्प जाहीर होण्यापूर्वीच गुजराती, मारवाड्यांनी इथे जमिनी कशा खरेदी केल्या? नाणारच्या जमिनी इतरांनी बळकावल्या हा भ्रष्टाचारच आहे, हा भूमाफियांचा घोटाळा आहे.'

'नाणारमध्ये शहा, कटियार या नावाचे शेतकरी आले कुठून? पैशाची किती मस्ती, ती मस्ती तुमच्याकडे करा. जगात काहीही विकत घ्या, पण शिवरायांचे मावळे विकत घेतले जाऊ शकत नाहीत. नाणार प्रकल्प गुजरातला जाईल, अशी भिती दाखवली जाते. मात्र, हा प्रकल्प गुजरातलाच न्या, आम्ही इकडे होऊ देणार नाही. दुसरीकडे भाजप आमदार आशिष देशमुख म्हणतात, नाणार प्रकल्प कोकणात झाला नाही, तर नागपूरला द्या. मग तिकडे न्या. कोकण नाही तर विदर्भात हा प्रकल्प होऊ द्या. हा प्रकल्प आम्ही जनतेवर लादणार नाहीत हे मुख्यमंत्र्यांचे शब्द होते. पण केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सौदी अरेबियासोबत सौदा केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाला केराच्या टोपलीत फेकले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीची किंमत दिली जात नाही,' असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाणारवासियांना शपथ घेण्याची विनंती करत, सरकारला एक इंचही जमीन देणार नाही, असा निर्धार करण्यास सांगितले. आज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहे, पण तुम्ही जुलूम केला तर आम्हाला देखील बेकायदेशीर मार्गाने जावे लागेल. जमिनींची मोजणी करायला येणाऱ्यांना तुमच्या पद्धतीने आडवा, असे ठाकरे यांनी नाणारवासियांना सांगितले.

ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्देः

 • नाणार हे नाणारच राहणार पण प्रकल्प जाणार.
 • भूसंपादन होणार नाही म्हणजे प्रकल्पच होणार नाही.
 • भूसंपादनाची मूळ अधिसूचना रद्द.
 • हा प्रकल्प गुजरातला न्यायचा आहे तर घेऊन जा.
 • हा प्रकल्प गुजरातऐवजी नागपूरला नेला तरी चालेल.
 • नाणारच्या जमिनी इतरांनी बळकावल्या हा भ्रष्टाचारच, हा भूमाफियांचा घोटाळा आहे.
 • माझ्या कोकणाचं मी गुजरात होऊ देणार नाही.
 • महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत कवडीची किंमत दिली जात नाही.
 • कोकणाला समुद्र किनारा लाभलाय, निसर्ग लाभलाय हा काय आमचा गुन्हा आहे?
 • नाणार जमिनीचा व्यवहार हा भूमाफियांचा घोटाळा.
 • आज आम्ही शांततेच्या मार्गाने चाललो आहे, पण तुम्ही जुलूम केला तर आम्हाला देखील बेकायदेशीर मार्गाने जावं लागेल.
 • तुम्ही आमच्या जमिनी खरेदी करु शकता पण आमच्यातील देशभक्ती तुम्ही खरेदी करु शकणार नाही.
 • सत्तेत असलो तरी ताटाखालचं मांजर झालो नाही, आमच्यातील वाघ जिवंत आहे.
Web Title: we will scrap nanar refinery project: uddhav thackeray