फळांच्या राजाला तडाखा फळगळतीचा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017

"पुन्हा मोहोर लागल्याने दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या उत्पादनाला फटका बसला आहे. या टप्प्यात येणाऱ्या उत्पादनावर बागायतदारांचे उत्पन्न अवलंबून असते. या वर्षी त्याला धक्‍का बसला आहे.'' 
- तुकाराम घवाळी, आंबा बागायतदार 

रत्नागिरी - गेल्या आठवड्यात पारा 11 ते 14 अंशांपर्यंत घसरल्याने त्याचा फटका आंब्याला बसला आहे. या कालावधीतील कमाल व किमान तपमानातील फरक सरासरीपेक्षा अधिक होता. थंडीमुळे पुन्हा मोहोर (रिफ्लॉवरिंग) आला आहे. परिणामी कैरी गळून गेली आहे. सुमारे 80 टक्‍के फळगळ झाल्याने मार्चअखेरीस येणारे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे. पहिल्या टप्प्यात आलेल्या दहा टक्‍के मोहोराला झालेल्या फळधारणेवरच बागायतदारांची धुरा आहे. एप्रिलनंतर बाजारात येणाऱ्या मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने या वर्षीचा हंगाम यथातथाच राहील, अशी भीती बागायतदारांकडून व्यक्‍त केली जात आहे. 

हंगामाच्या सुरवातीला पोषक वातावरण होते. त्यामुळे आंब्याला मोहोरही चांगला आला. सुरवातीच्या टप्प्यातील उत्पादन चांगले मिळाले आहे. दोनच दिवसांपूर्वी पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना झाली. रत्नागिरी जिल्ह्यातून सुमारे 25 पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. 4 हजार ते 8 हजार रुपये पेटीला दर मिळत आहे; परंतु थंडीचा जोर जानेवारीतही कायम राहिल्याने रिफ्लॉवरिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. कैरी लागलेल्या ठिकाणी मोहोर नव्याने आला. उन्हामुळे सुपारीएवढी झालेली कैरी गळून गेली आहे. त्यातून मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात उत्पादन मिळाले असते. आंबा फळाला 16 अंश सेल्सिअसखाली तापमान चालत नाही. या वेळी 11 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. परिणामी थंडीचा कडाकाही कायम राहिला. सध्या आलेल्या मोहोराचे उत्पादन एप्रिलमध्ये मिळणार आहे. मार्चमध्ये अवघे 10 टक्‍केच उत्पादन मिळेल, असा अंदाज आहे. सध्या मार्केटमध्ये कर्नाटक, केरळमधील आंब्याची आवक सुरू झाली आहे. ती पुढे वाढतच जाईल. त्याचे आव्हान रत्नागिरी हापूसपुढे असून दरावर त्याचा परिणाम होतो. 

"पुन्हा मोहोर लागल्याने दुसऱ्या टप्प्यात येणाऱ्या उत्पादनाला फटका बसला आहे. या टप्प्यात येणाऱ्या उत्पादनावर बागायतदारांचे उत्पन्न अवलंबून असते. या वर्षी त्याला धक्‍का बसला आहे.'' 
- तुकाराम घवाळी, आंबा बागायतदार 

Web Title: weather effect on mando trees