पावसाअभावी तयार झालेली भात रोपे संकटात

जिल्ह्यात अनेक तालुक्यात पावसाचे असमान वितरण
Weather updater maharashtra Rice seedlings in crisis due to lack of rain pali raigad
Weather updater maharashtra Rice seedlings in crisis due to lack of rain pali raigadsakal

पाली : जिल्ह्यात वरुणराजा उशिराने दाखल झाला. त्यातच अनेक तालुक्यात पावसाने दडी मारली आहे. विविध तालुक्यात पावसाचे असमान वितरण पहायला मिळत आहे. परिणामी अत्यल्प पाऊस झालेल्या तालुक्यातील तयार झालेली भात रोपे संकटात सापडली आहेत. जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील 16 तालुके मिळून रविवार (ता.26) पर्यंत सरासरी 222.34 मिमी पाऊस झाला आहे. त्यामध्ये सर्वात कमी सुधागड 124.24 मिमी, त्यानंतर पोलादपूर 124.70 मिमी, रोहा 128 मिमी, पनवेल 129.80, मिमी, उरण 144 मिमी, माणगाव 152 मिमी, महाड 154 मिमी, पेण 157 मिमी, कर्जत 158.50 तर सर्वाधिक पाऊस श्रीवर्धन 572.00 मिमी, अलिबाग 336.00 मिमी, माथेरान 330.10 मिमी, मुरुड 319.00 मिमी, खालापूर 266.00 मिमी, म्हसळा 264.00 मिमी, तळा 201.00 मिमी या तालुक्यांचा समावेश आहे.

मागील वर्षी 26 जून पर्यंत जिल्ह्यात सरासरी 941.56 मिमी पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी 26 जून पर्यंत अवघ्या 222.34 मिमी पावसाची नोंद झाली आहे. परिणामी मागील वर्षीच्या पावसाच्या तुलनेत यंदा मोठ्या प्रमाणात तफावत पहायला मिळत आहे. ज्या तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडला आहे तेथील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. रोहा येथील एका शेतकऱ्याने तर दडी मारलेल्या पावसावर कविता देखील लिहिली आहे.

रोज येतोय आभाळ भरून

पण का देतोय हुलकावणी दुरून

ये मेघराजा पड तू भरभरून।

आता वाट पाहायला नको लावूस7

जास्त भाव पण नको खाऊस

या धरतीची आम्ही लेकरे

तुझे दिवस चाललेत सरून

ये मेघराजा पड तू भरभरून।।

शेतकरी झालाय हवालदिल

त्याच्या मनाची झालीय काहिल

नदी नाले तलाव गेलेत आटून

तू नाहीस विहिरीला पाणी येणार कुठून

ये मेघराजा पड तू भरभरून।।।

आमचं चुक असेल तर क्षमा कर

या धरणीमातेला आता शांत कर

सूर्य हा तळपतोय आकाशातून

तापमान सुद्धा गेला मर्यादा ओलांडून

ये मेघराजा पड तू भरभरून

ये मेघराजा पड तू आता भरभरून।।।।

- गणेश बा. भगत अध्यक्ष, रोहा तालुका शेतकरी विकास प्रतिष्ठाण

शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात पाऊस पडल्यावर रोहू पद्धतीने बियाणे पेरावे. हळव्या किंवा कमी कालावधीच्या बियाण्यांचा वापर करावा.

- उज्वला बाणखेळे, रायगड जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी, अलिबाग

पावसाअभावी भात रोपांची वाढ खुंटू नये यासाठी रोपवाटिकांना पर्यायी पाण्याची किंवा सिंचनाची व्यवस्था करावी. तसेच ज्या ठिकाणी सिंचन सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी रोपवाटिकांना झारीने दिवसातून किमान एकदा पाणी द्यावे. पाऊस सुरू होताच रोपांची वाढ जोमदार होण्यासाठी शिफारशीनुसार खत मात्र देण्यात यावी.

- दत्तात्रेय काळभोर, कृषी उपसंचालक, अलिबाग, रायगड

आत्तापर्यंत पाऊस खूप कमी पडला आहे. मात्र पडलेल्या पावसावर भाताची रुजवन चांगली झाली आहे. रोपेसुद्धा मोठी झालीत. मात्र पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारल्याने चिंता वाटत आहे.

- मालू कोकरे, शेतकरी, सुधागड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com