दारूसाठी धारधार हत्याराने पत्नीचा निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2019

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून खून झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संशयितास वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे ताब्यात घेतले.

रत्नागिरी - तालुक्‍यातील खालगाव-जाकादेवी येथे एकाने पत्नीचा धारधार हत्याराने 12 वार करून खून केला. बुधवारी (ता. 30 ऑक्‍टोबर) मध्यरात्री हा प्रकार घडला. त्यांनंतर संशयिताने तेथून पलायन केले.

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून खून झाल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संशयितास वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे ताब्यात घेतले. कोल्हापूर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. 

राजेंद्र अडीअप्पा गंटेनेवर (रा. खालगाव रोड, तळ्याजवळ-जाकादेवी) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार गुरुवारी (ता. 31) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी संशयिताची मुलगी करिश्‍मा राजेंद्र गंटेनेवर हिने ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी - करिश्‍माचे वडील राजेंद्र गंटेनेवरला दारूचे व्यसन होते. आई उज्ज्वला राजेंद्र गंटेनेवर (वय 40, रा. खालगाव-जाकादेवी) लसूण व भाजी विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या. त्या बुधवारी जाकादेवी येथील आठवडा बाजारात भाजी विकण्यासाठी गेल्या होत्या. भाजी विकून सायंकाळी सात वाजता परतल्या.

त्यावेळी राजेंद्र दारूच्या नशेत घरी आला होता. त्याने पुन्हा आईकडे दारूसाठी पैसे मागितले. काही कामधंदा करत नाहीत, दारूसाठी पैसे मागता, मी तुम्हाला पैसे देणार नाही, असे तिने त्याला सुनावले. याचा राग धरून राजेंद्रने उज्ज्वला यांना शिवीगाळ करून "तू पैसे देत नाहीस तर तुला मी ठार मारीन', अशी धमकी दिली होती. 

करिश्‍मा आजीकडे झोपायला गेली होती. गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास तिचा चुलत मामा महेंद्र गवळी यांनी फोन करून कळविले की, तुझे आई-वडील घरी झोपले आहेत का ते जाऊन बघ. करिश्‍माने तत्काळ उठून घराच्या पुढील दरवाजाकडे जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; परंतु पुढील दरवाजा बंद होता. ती पाठीमागच्या दरवाजाकडे गेली तर तो उघडा दिसला. घरात गेली तर आईच्या अंगावर चटई व गोधडी टाकलेली होती. ती बाजूला करून पाहिले असता तिच्या डोक्‍याखाली व बाजूला रक्त पडलेले दिसले. तिला मोठा धक्का बसला आणि तिने हंबरडा फोडला. बाहेर येऊन तिने चुलत मामा महेंद्र यांना हाक मारली.

आई रक्ताच्या थारोळ्यात पडली असून वडील घरात दिसत नाहीत असे सांगितले. त्यानंतर चुलत मामा व करिश्‍मा यांनी घरात जाऊन पाहिले असता आईच्या डाव्या हातावर, हनुवटीवर, डोळ्यावर, चेहऱ्यावर गंभीर जखमा झालेल्या होत्या. त्यानंतर करिश्‍मा व मामा महेंद्र यांनी घरात व आजूबाजूला वडिलांचा शोध घेतला. मात्र तो कुठे दिसून आले नाहीत. 

पोलिसांनी संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक सुरेश कदम तपास करत आहेत. पतीवरील संशय बळावल्यानंतर ग्रामीण पोलिस त्याच्या मागावर होते. ग्रामीण पोलिसांना त्याला वारणानगर येथे ताब्यात घेतले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife Murdered by Drunken Husband Incidence In Ratnagiri