वन्यप्राण्यांचा उपद्रव रोखण्यासाठी सीमेवर सौरकुंपण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

चांदा ते बांदा योजनेतून १ कोटींची तरतूद - वैयक्तिक लाभाची योजना तयार करण्याची मागणी

सावंतवाडी - जंगली प्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी बाधित गावाच्या सीमेवर सौरकुंपण उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. यासाठी चांदा ते बांदा या योजनेतून एक कोटी रुपयांची तरतूद केल्याचे वृत्त आहे.

चांदा ते बांदा योजनेतून १ कोटींची तरतूद - वैयक्तिक लाभाची योजना तयार करण्याची मागणी

सावंतवाडी - जंगली प्राण्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी बाधित गावाच्या सीमेवर सौरकुंपण उभारण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हालचाली सुरू आहेत. यासाठी चांदा ते बांदा या योजनेतून एक कोटी रुपयांची तरतूद केल्याचे वृत्त आहे.

ही सौरकुंपणे देताना सरसकट सीमेवर न मारता ७५ टक्के निधी देऊन शेतकऱ्यांना त्याचा वैयक्तिक लाभ द्यावा. जेणे करून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि त्या कामात आर्थिक अपहार होणार नाही, अशी मागणी पंचायत समिती सदस्य बाबू ऊर्फ श्रीकृष्ण सावंत यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

याबाबतची माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘ज्या गावांना जंगली प्राण्यांचा त्रास सहन करावा लागतो तेथील शेती बागायतीत जंगली प्राणी घुसू नयेत यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातर्फे सौरकुंपण उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर संबंधित विभागाकडून बैठका घेतल्या. त्यात दिलेल्या माहितीनुसार जी गावे बाधित आहे त्यांच्या सीमेवर सौरकुंपण उभारण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत; मात्र त्यासाठी आवश्‍यक असलेली पन्नास टक्के रक्कम शेतकऱ्यांनी द्यायची आहे. यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे; मात्र ही योजना चांगली असली तरी सद्यस्थिती लक्षात घेता योजना राबविताना अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ज्या ठिकाणी गवा, मोर, डुक्कर अशा जंगली प्राण्यांचा उपद्रव होता. त्या ठिकाणी जंगलाच्या सिमेवर ही सौरकुंपणे उभारण्यात यावीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.

सौर कुंपण उभारणे योग्य असले तरी जंगलाच्या सिमेवर उभारलेली सौरकुंपणे यशस्वी होतील, असे नाही. तालुक्‍यात नेमळे येथे लाखो रुपये खर्च करुन घालण्यात आलेल्या कुंपणाच्या कामात आर्थिक अपहार होऊन निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. जरी चांगले काम झाले तरी त्या कुंपणाची डागडुजी कोण करणार हा प्रश्‍न आहे. त्यामुळे यापुढे कुंपण जाहीर करताना ती सर्व शेतकऱ्यांचा विचार करून न उभारता वैयक्तिक लाभ द्यावा. त्यासाठी आवश्‍यक असलेली ७५ टक्के सबसिडी देवून २५ टक्के रक्कम संबधित शेतकऱ्यांकडून घेण्यात यावी. त्यामुळे काम दर्जेदार होणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची शेती वाचण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आपल्या मागणीचा विचार प्रशासनाने करावा.’’
 

वैयक्तिक लाभ दिल्यास फायदाच
या वेळी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक सुभाष पुराणिक म्हणाले, ‘‘श्री. सावंत यांच्या मागणीनुसार वैयक्तीक लाभ दिल्यास त्याचा फायदा होणार आहे. निकृष्ट कामे होणार नाही तसेच ज्या शेतकऱ्याला गरज आहे अशी व्यक्ती सौरकुंपण घेवू शकते. अन्य शेतकऱ्यांनी विरोध केला तरी काम अडणार नाही. त्यामुळे त्यांच्या सूचनेचा विचार करण्यार हरकत नाही.

Web Title: Wild animals annoyance on the border to prevent solar compound